आंध्र प्रदेशमध्ये दारूबंदी करण्यावर जगनमोहन ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 04:39 AM2019-05-28T04:39:08+5:302019-05-28T04:39:14+5:30

आंध्र प्रदेशमध्ये पुढच्या पाच वर्षांत संपूर्ण दारूबंदी लागू करण्यावर आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री व वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी ठाम आहेत.

In Andhra Pradesh, Jagan Mohan Tham | आंध्र प्रदेशमध्ये दारूबंदी करण्यावर जगनमोहन ठाम

आंध्र प्रदेशमध्ये दारूबंदी करण्यावर जगनमोहन ठाम

googlenewsNext

विजयवाडा : आंध्र प्रदेशमध्ये पुढच्या पाच वर्षांत संपूर्ण दारूबंदी लागू करण्यावर आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री व वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी ठाम आहेत. हे धोरण यशस्वीपणे अमलात आणू न शकल्यास २०२४ मध्ये मी जनतेकडे मते मागायला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी पंतप्रधान मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. आंध्रला विशेष दर्जा मिळण्याबाबत चर्चाही केली. त्यानंतर विजयवाडामध्ये पत्रकारांना सांगितले की, आंध्रात फक्त पंचतारांकित हॉटेलमध्येच मद्यविक्रीसाठी परवानगी देण्यात येईल. दारू दुकाने, गुत्ते यावरही कारवाईचा विचार आहे.
संपूर्ण दारूबंदी धोरणाचा आराखडा बनविण्याचे काम रेड्डी यांनी जनचैतन्य वेदिका या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख व्ही. लक्ष्मा रेड्डी यांच्याकडे सोपविले आहे. ही बंदी आधी एक वर्षासाठी लागू केली जाईल व नंतर टप्प्याटप्प्याने मुदतीत वाढ होईल. पाच वर्षांनंतर संपूर्ण आंध्र प्रदेशात दारू बंद झालेली असेल, असा विश्वास जगनमोहन यांनी व्यक्त केला.
व्ही. लक्ष्मा रेड्डी म्हणाले की, संपूर्ण दारूबंदीसाठी दारूच्या घाऊक व किरकोळ व्यापारावरही राज्य सरकार नियंत्रण ठेवणार आहे. या दुकानांची संख्या कमी करण्याची सूचना धोरणाच्या आराखड्यात करणार आहोत. अशीच पावले केरळ, दिल्ली, तामिळनाडूमध्येही उचलली आहेत. संपूर्ण दारूबंदीचे धोरण अमलात आल्यास आंध्रात दारूच्या किमतीत वाढ होईल. राज्यात यासाठी जागृती मोहीम सुरू करावी, अशीही तरतूद संपूर्ण दारूबंदीच्या धोरणात असेल. (वृत्तसंस्था)
धूम्रपानामध्ये आंध्र प्रदेश आघाडीवर
दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आंध्र प्रदेश मद्यप्राशनात आघाडीवर असून त्यानंतर केरळचा क्रमांक लागतो. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या २०११-१२ या वर्षाच्या अहवालानुसार आंध्र प्रदेशमध्ये एक व्यक्ती दरवर्षी ३४.५ लीटर तर केरळमध्ये १०.२ लीटर इतके मद्यप्राशन करते. इतर राज्यांपेक्षा आंध्र प्रदेशमधील युवक अधिक प्रमाणात मद्यप्राशन करतात. धूम्रपान करणाऱ्यांची संख्याही आंध्र व केरळमध्ये लक्षणीय आहे. सध्या गुजरात व बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी आहे.

Web Title: In Andhra Pradesh, Jagan Mohan Tham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.