Andhra Pradesh Jinnah Tower: जिन्ना टॉवरवर तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न, हिंदू वाहिनीचे नेते पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 02:49 PM2022-01-27T14:49:23+5:302022-01-27T14:49:46+5:30
यापूर्वी 30 डिसेंबर रोजी भाजपच्या वतीने या जिन्ना टॉवरचे नाव माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावर ठेवण्याची मागणी करण्यात आली होती.
हैदराबाद:आंध्र प्रदेशातीलगुंटूर शहरात पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या नावाचे एक टॉवर आहे. 26 जानेवारीला या टॉवर परिसरात प्रचंड गोंधळ झाला. परिस्थिती बिघडण्याच्या भीतीने पोलिसांनी खबरदारी म्हणून येथे 144 कलम लागू केली आहे. असे असतानाही काही हिंदू संघटनांनी मोहम्मद अली जिन्नाचे नाव असलेल्या टॉवरवर तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान कोठापेठ परिसरात सुमारे 15 ते 20 नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
परिसरात तणावपूर्ण परिस्थिती
या भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू वाहिनी संघटनेचे काही सदस्य जिन्ना टॉवरकडे कूच करत होते. त्यांनी जिन्ना टॉवरवर तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला. या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाची माहिती जिल्हा प्रशासनालाही होती, त्यामुळे गुंटूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांसह जिन्ना टॉवरला घेराव घातला. तेथे मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
टॉवरला अब्दुल कलामांचे नाव देण्याची मागणी
यापूर्वी 30 डिसेंबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी जिन्ना टॉवरचे नाव माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम किंवा दलित कवी गुर्राम जोशुआ यांच्या नावावर ठेवावे, असे म्हटले होते. तसेच, देशाची फाळणी आणि अनेक लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्यक्तीचे नाव तुम्ही कसे वापरत राहू शकता, असा सवाल तेलंगणातील भाजप आमदार राजा सिंह यांनी केला होता.
जिन्ना टॉवरचा इतिहास
असे म्हटले जाते की, 1945 मध्ये फाळणीपूर्वी जिन्ना एका सार्वजनिक सभेला संबोधित करण्यासाठी गुंटूरला आले होते. तेव्हा स्थानिक मुस्लिमांनी त्यांच्या नावावर एका मिनाराचे नाव ठेवले. या टॉवरला घुमटाच्या आकाराची रचना असलेले सहा खांब आहेत आणि स्थानिक लोक ते सौहार्द आणि शांततेचे प्रतीक मानतात. एवढेच नाही तर या जागेला जिन्ना सेंटर म्हणूनही ओळखले जाते.