शेतात हिरा सापडला अन् क्षणात शेतकरी लखपती झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 01:48 PM2019-07-21T13:48:45+5:302019-07-21T13:51:43+5:30
कुरनूल जिल्ह्यातील एक शेतकरी एका रात्रीत लखपती बनला आहे. शेतकऱ्याला शेतामध्ये एक हिरा सापडल्याची घटना समोर आली आहे.
हैदराबाद/कुरनूल - कोणाचं नशीब हे कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. रातोरात लखपती झाल्याच्या अनेक घटना या समोर येत असतात. अशीच एक घटना आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात घडली आहे. कुरनूल जिल्ह्यातील एक शेतकरी एका रात्रीत लखपती बनला आहे. शेतकऱ्याला शेतामध्ये एक हिरा सापडल्याची घटना समोर आली आहे. शेतात नांगरत असताना मिळालेल्या हिऱ्याची बाजारातील किंमत ही जवळपास 60 लाख आहे.
शेतकऱ्याने मिळालेला हिरा एका स्थानिक व्यापाऱ्याला विकला. व्यापाऱ्याने या शेतकऱ्याला हिऱ्याच्या बदल्यात 13.5 लाख रुपयांची रोख रक्कम आणि पाच तोळे सोने दिले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कुरनूल जिल्हातील गोलावनेपल्ली गावातील एका शेकऱ्याला शेत नांगरत असताना एक हिरा मिळाला. हिऱ्याची साईज, रंग आणि वजन याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कुरनूल जिल्ह्यामध्ये हिरा मिळाल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी 12 जून रोजी याच जिल्ह्यातील एका मेंढपाळाला 8 कॅरेटचा एक हिरा मिळाला होता. मेंढपाळाने हा हिरा 20 लाखांना विकला होता. मात्र, त्या हिऱ्याची खरी किंमत होती 50 लाख रुपये होती. पावसाळा सुरू झाला की कुरनूल जिल्ह्यात हिऱ्यांचा शोध सुरू होतो. हिऱ्याच्या शोधात लोक येथे येत असतात. हिऱ्याचे क्षेत्र अशी या ठिकाणाची ओळख आहे.
मध्य प्रदेशमधील हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्ना जिल्ह्यामध्ये काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे एका मजुराचं नशीब फळफळलं होतं. जमिनीत खोदकाम करत असताना मजुराला 42.59 कॅरेटचा एक मौल्यवान हिरा सापडला होता. मोतीलाल प्रजापती असं हिरा सापडलेल्या मजुराचं नाव असून खाणीत सापडलेला हा सगळ्यात जास्त वजनाचा दुसऱ्या क्रमांकाचा हिरा होता. माझ्या कुटुंबियांसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचं मोतीलालने म्हटलं होतं. जी रक्कम मिळेल ती रक्कम कुटुंबाच्या भल्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार असल्याचंही त्याने सांगितलं होतं. याआधी 1961 मध्ये येथे 44.55 कॅरेटचा सर्वात मोठा आणि मौल्यवान हिरा सापडला होता.