मुख्यमंत्र्यांप्रति निष्ठा; जगनमोहन रेड्डींच्या नावे आमदाराने घेतली शपथ, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 10:54 AM2019-06-13T10:54:38+5:302019-06-13T11:11:38+5:30
'मी एका गरीब कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे याबाबत कोणतीही राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नाही आहे.'
विजयवाडा : आंध्र प्रदेशातील एका नवनिर्वाचित आमदाराने मुख्यमंत्री आणि व्हायएसआर काँग्रेस अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या नावाने शपथ घेतली. नेल्लोर ग्रामीण मतदारसंघातील आमदार कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी ईश्वर साक्ष शपथ घेतो की...असे न म्हणता मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नाव घेत शपथ घेतली. यावेळी कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांप्रति आपली निष्ठा व्यक्त करताना सांगितले की जगन मोहन रेड्डी माझ्यासाठी भगवान आहेत.
आमदार कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी मुख्यमंत्र्यांचे नावे शपथ घेतली असली तरी त्यांना विधानसभेचे हंगामी सभापती अप्पाला नायडू यांनी तत्काळ दुसऱ्यांदा शपथ घेण्यास सांगितले. त्यानंतर कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी ईश्वर साक्षीने शपथ घेतली. कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी भावनेच्या भरात नियमांना डावलून शपथ घेतली.
यावेळी कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी म्हणाले,'मी एका गरीब कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे याबाबत कोणतीही राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नाही आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मला दोनवेळा आमदार केले आहे. त्यांच्या नावाने शपथ नावे शपथ घेण्यामागे माझी कोणतीही मंत्रीपदाची अपेक्षा नाही. गेल्या पाच वर्षांत माझा पगार गरीब मुलांसाठी दिला आहे.
याचबरोबर, टीडीपीच्या काही आमदारांनी याआधी एनटी रामराव यांच्या नावाने शपथ घेतली होती, त्यावेळी असे करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती, असा दावा करत जर मी आपल्या नेत्याला भगवान मानतो, तर यात चुकीचे काय आहे, असेही कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी म्हणाले.
दरम्यान, संविधानाच्या अनुच्छेद 188 च्या नियमांनुसार आमदार शपथ घेतात. यानुसार आमदार ईश्वराच्या साक्षीने किंवा संविधानाच्या साक्षीने शपथ घेतात. जानेवारी 2017 मध्ये भारतीय शपथ कायदा 1969 नुसार तिसरा पर्याय देण्यासाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.
आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यात 15 ऑक्टोबरपासून 'रायतू भरोसा' योजना लागू होणार असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 12,500 रुपये दिले जाणार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी टीडीपी सरकारची 'अन्नदाता सुखीभव' योजना रद्द केली आहे. आंध्र प्रदेशच्या आधीच्या सरकारनं फेब्रुवारी 2019ला निवडणुकीपूर्वी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत चंद्रबाबूंनी शेतकऱ्यांना वर्षाला 10 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. दुसरीकडे मुख्यमंत्री झाल्यापासून जगनमोहन रेड्डी जलद गतीनं निर्णय घेत आहेत. तत्पूर्वी जगनमोहन यांनी स्वतःच्या कार्यालयातील पहिल्याच दिवशी वृद्धांची पेन्शन वाढवण्याचा आदेश दिला आहे.