मुलाने टाकला मावशीच्या अब्रुवर हात; आईने दिली भयंकर शिक्षा, हत्या करुन कालव्यात फेकला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 21:24 IST2025-02-15T21:24:20+5:302025-02-15T21:24:20+5:30
आंध्र प्रदेशात एका आईने मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह कालव्यात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे.

मुलाने टाकला मावशीच्या अब्रुवर हात; आईने दिली भयंकर शिक्षा, हत्या करुन कालव्यात फेकला मृतदेह
Crime News: आंध्र प्रदेशातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात एका महिलेने आपल्याच मुलाच्या वागणुकीला कंटाळून त्याची निर्घृणपणे हत्या केली. महिलेने मुलावर कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला होता ज्यात त्याचा मृत्यू झाला. हे प्रकरण समोर येऊ नये म्हणून महिलेने तिच्या नातेवाईकांच्या मदतीने मृतदेहाचे पाच तुकडे केले. एवढ्यावरच न थांबता महिलेने मुलाच्या मृतदेहाचे अवयव तीन गोण्यांमध्ये बांधून जवळच्या कुंबम गावातील नाकलागंडी कालव्यात फेकून दिले. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांसह पोलिसांनाही जबर धक्का बसला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात एका ५७ वर्षीय महिलेने आपल्या मुलाच्या गैरवर्तनाला कंटाळून त्याची हत्या केली आणि नातेवाईकांच्या मदतीने त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले. के लक्ष्मी देवी (५७) या महिलेने दोन दिवसांपूर्वी मुलगा के श्याम प्रसाद (३५) याची निर्घृणपणे हत्या केली. श्याम प्रसाद हा सफाई कामगार म्हणून काम करत होता. लक्ष्मीदेवीच्या नातेवाईकांनी श्याम प्रसादच्या हत्येसाठी मदत केल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
आपल्या मुलाचे चुकीचे आणि असभ्य वर्तन सहन न झाल्याने लक्ष्मी देवीने त्याची हत्या केली. श्याम प्रसादने हैदराबादमधील त्याच्या मावशांसोबतही गैरवर्तन केले होते. मृत श्याम प्रसादने त्याच्याच मावशीवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. श्याम प्रसाद हा अविवाहित असून त्याने हैदराबाद आणि नरसरावपेटा येथील आपल्या मावशीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक एआर दामोदर यांनी दिली.
श्याम प्रसादला पकडल्यानंतर लक्ष्मी देवी आणि त्याच्यामध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर लक्ष्मीदेवीने मुलाची कुऱ्हाडीने किंवा धारदार शस्त्राने हत्या केली. हत्येनंतर त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे करून तीन गोण्यांमध्ये भरून कालव्यात फेकून दिले. हत्येनंतर लक्ष्मी देवी आणि तिचे सर्व नातेवाईक फरार झाले आहेत.
दरम्यान, या हत्येमध्ये किती जणांचा सहभाग होता आणि हा पूर्वनियोजित कट होता का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. एका आईने आपल्याच मुलाची हत्या केल्याने लोकांना धक्का बसला आहे. सर्व आरोपींना पकडण्यासाठी पोलीस सध्या तपास करत आहेत.