चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाच्या नेत्यावर कुऱ्हाडीने हल्ला; मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांच्या मुलाने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 07:10 PM2024-06-11T19:10:17+5:302024-06-11T19:13:37+5:30
आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाच्या नेत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय.
TDP Leader Attacked: आंध्र प्रदेशातचंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्षाच्या नेत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय. चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला करुन टीडीपी नेत्याची हत्या करण्यात आली. आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात चाकू आणि कुऱ्हाडीने टीडीपी नेते गौरीनाथ चौधरी हल्ला यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात नेते गौरीनाथ चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर या हल्ल्याचा आरोप आहे.
ही घटना बोम्मिरेड्डीपल्ले गावात घडली. या गावातील वायएसआरसीपीच्या कार्यकर्त्यांवर चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. गौरीनाथ चौधरी हे या भागातील टीडीपीचे प्रमुख नेते होते. चौधरी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचे नेतृत्व वायएसआरसीपी कार्यकर्ते पमय्या, रामकृष्ण आणि इतर करत होते. हत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सुरक्षा दल तैनात करण्यात आलं आहे.
कर्नूलचे पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाला भेट दिली असून स्थानिक लोकांना सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात पोलीस चौकीही उभारण्यात आली आहे. टीडीपी प्रमुख आणि मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे.
"वायएस जगन मोहन रेड्डी हरले तरीही त्यांनी रक्तरंजित इतिहास लिहिणे सुरूच ठेवले आहे. कुरनूल जिल्ह्यातील वेलदुर्थी मंडलातील बोम्मिरेड्डीपल्ले येथील टीडीपी नेते गौरीनाथ चौधरी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. जगन रेड्डी लोकांची हत्या करत आहेत. जर जगन रेड्डी यांनी हत्येचे राजकारण थांबवले नाही तर , परिणाम गंभीर होतील. गौरीनाथ चौधरी यांच्या कुटुंबाला टीडीपीचा पाठिंबा आहे. आरोपींना सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वायएसआरसीपीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यांची आम्ही चौकशी करू," असे नारा लोकेश यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीडीपीने १७५ पैकी १३५ जागा जिंकल्या आहेत. जनसेना पक्ष आणि भाजपने अनुक्रमे २१ आणि ८ जागा मिळवल्या. गेल्या निवडणुकीत १५१ जागा जिंकणाऱ्या वायएसआरसीपीने केवळ ११ जागा मिळाल्या आहेत.