शाळा बंद, रेल्वे रद्द...! तेलंगणा-आंध्रमध्ये पावसाचा कहर, पंतप्रधान मोदी यांचं मुख्यमंत्र्यांना मदतीचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 08:31 AM2024-09-02T08:31:08+5:302024-09-02T08:32:11+5:30
AP Telangana Flood : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी संवाद साधून अतिवृष्टी आणि पूर स्थितीचा आढावा घेतला आहे.
Telangana-Andhra Pradesh Flood : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पावसाने कहर केला आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पूर स्थिती निर्माण झाली असून जीवित आणि वित्तहानी, तसेच मोठ्या प्रमाणावर जनजीवनही विस्कळीत झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. यामुळे नद्यांना उधाण आले आहे. हैदराबाद आणि विजयवाडा सारख्या शहरांसह बराच मोठा भाग पाण्याखाली आहे.
पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि बचाव कार्यात समन्वय साधण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी तातडीच्या बैठका घेतल्या. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही दोन्ही मुख्यमंत्र्यांशी संवाध साधला असून त्यांना केंद्राकडून संपूर्ण मदत पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.
याशिवाय, स्थानिक परिस्थितीनुसार 2 सप्टेंबर रोजी शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. रेल्वेचा विचा करता, दक्षिण मध्य रेल्वेच्या (SCR) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने 99 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच चार गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. तर 54 गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
नरेंद्र मोदींनी घेतला पूर स्थितीचा आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी संवाद साधून अतिवृष्टी आणि पूर स्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच, या दोन्ही राज्यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
तेलंगानामध्ये 9 जणांचा मृत्यू
तेलंगणामध्ये पावसाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. रविवारी हैदराबादसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरूच होता. मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी नाले भरून वाहत आहेत. सखल भागात पाणी साचले आहे. पुराच्या पाण्यामुळे गावा गावांतील रस्त्यांद्वारे होणारा संपर्क विस्कळीत झाला आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या.