मंदिराला बनवलं स्टडी कॉर्नर, यूट्यूबवरुन केला अभ्यास; कोचिंगशिवाय रेल्वेत मिळाल्या 2 नोकऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 11:03 AM2023-05-17T11:03:46+5:302023-05-17T11:09:33+5:30
बोन्था रेड्डी याला सरकारी नोकरीची तयारी करायची होती. पण कोणत्याही कोचिंगमध्ये जाण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडे पुरेसे पैसे नव्हते.
जर एखादं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली तर ते नक्कीच पूर्ण होतं. बोन्था तिरुपती रेड्डी यांचीही अशीच प्रेरणादायी गोष्ट आहे. 27 वर्षीय बोन्था याला रेल्वेत दोनदा सरकारी नोकरी मिळाली. बोन्था रेड्डी याला सरकारी नोकरीची तयारी करायची होती. पण कोणत्याही कोचिंगमध्ये जाण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडे पुरेसे पैसे नव्हते. आर्थिक परिस्थिती बिकट होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील पोसुपल्ली गावातील बोन्था रेड्डी याला कोणत्याही कोचिंगशिवाय रेल्वेत दोन नोकऱ्या मिळाल्या. त्याच्याकडे फारच कमी संसाधने होती पण त्यांनी संसाधनांचा चांगला वापर केला. रेड्डी य़ाने यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी केली. विविध यूट्यूब चॅनलद्वारे जीके आणि रिझनिंगची तयारी केली.
बोन्थाने मॅथ्स, फिजिक्स आणि कॉम्युटर सायन्समधून ग्रॅज्युएशन केलं आहे. पदवीनंतर त्याने आरआरबीची तयारी सुरू केली. बर्याच मेहनतीनंतर, दक्षिण-पश्चिम रेल्वे, बेंगळुरू विभागात ग्रेड-IV सहाय्यक आणि एक व्यावसायिक कम तिकीट लिपिक म्हणून दोन नोकऱ्या मिळवल्या. बोन्था रेड्डी याने सांगितले की, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, म्हणून त्याने वडिलांना शेतीत मदत करण्याचा आणि परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
बोन्था त्यामुळेच कोचिंगला गेला नाही. घरात मोबाईल नेटवर्क चांगले नसल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळेच शेताजवळ बांधलेल्या मंदिराचा अभ्यासासाठी वापर केला. रेड्डी याच्या म्हणण्यानुसार, तो रोज 10 ते 12 तास अभ्यास करत असे. तो संध्याकाळी 7 ते 11 या वेळेत यूट्यूबवर क्लासेससाठी हजर राहायचा आणि त्याच्या नोट्स तयार करायचा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.