किस्सा कुर्सी का...
By admin | Published: October 9, 2014 04:41 AM2014-10-09T04:41:34+5:302014-10-09T04:41:34+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातचे असल्याने बापू अर्थात मोहनदास (मोहनलाल नव्हे बरं!) करमचंद गांधी आपलेसे वाटले असतील
ही सफाई कशाची?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातचे असल्याने बापू अर्थात मोहनदास (मोहनलाल नव्हे बरं!) करमचंद गांधी आपलेसे वाटले असतील, असा रा.स्व.संघाचा समज होता. परंतु आता देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या १४ नोव्हेंबरच्या १२५ व्या जयंती दिनापासून १९ नोव्हेंबरच्या इंदिरा गांधी जयंतीपर्यंत सर्व शाळांमध्ये स्वच्छ भारत अभियान राबवण्याच्या मोदींच्या घोषणेनं रास्वसंघाच्या अनेक शाखांमधील स्वयंसेवकांच्या डोक्यावरील केस उभे राहिले आहेत. (डोक्यावर केस शाबूत असलेल्या स्वयंसेवकांची शाखाशाखांमधील संख्या रोडावलेली आहे हा भाग अलाहिदा) मोदींच्या महात्मा गांधी प्रेमामुळं अनेक संघ स्वयंसेवकांनी आपल्या घरातील नथुरामाच्या तसबीरी उतरवून ठेवल्या. परंतु इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनापर्यंत स्वच्छता अभियान राबवण्याची मोदींची कल्पना घशाखाली उतरवताना अनेक स्वयंसेवकांना म्लेंच्छानं भरवलेली मिठाई घशाखाली उतरवताना होतील तशा वेदना होत आहेत. आणीबाणीच्या काळात पोलिसाची शिट्टी वाजली तरी घरातील कॉटखाली लपून काढलेल्या रात्री अनेकांना आठवल्या आणि सर्वांगावरील केस उभे राहिले. प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांचा वाढदिवस ११ सप्टेंबरला होता. त्या दिवसापासून अभियान सुरु केले असते तर काय बिघडले असते, असा सवाल केला जात आहे. गोळवलकर गुरुजी, हेडगेवार, देवरस ही नावं मराठी असल्याने तर त्यांच्या जयंतीचा विसर मोदींना पडलेला नाही नां? लालकृष्ण अडवाणी (८ नोव्हेंबर), मुरली मनोहर जोशी (५ जानेवारी) या सध्या सक्तीची निवृत्ती लादलेल्या भाजपाच्या माजी अध्यक्षांच्या वाढदिवसापासून अभियान सुरु झाले असते तर त्यांच्या दुर्मुखलेल्या चेहऱ्यावर बारीक स्मितरेषा उमटली असती. कुशाभाऊ ठाकरे किंवा जना कृष्णमूर्ती यांच्या जयंतीचे औचित्य साधले गेले असते तर हे दोघे कोणे एकेकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते याचे स्मरण झाले असते. महाराष्ट्रातील निवडणुकीत पन्नासेक उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादीतून आयात करायचे आणि अभियानाकरिता काँग्रेसच्या नेत्यांचीच निवड करायची ही काय रास्वसंघ-भाजपाच्या परंपरेवर झाडू फिरवण्याची मोदीनीती तर नाही नां? डोक्यावरील उभ्या राहिलेल्या केसांवरून हात फिरवताना हाच विचार स्वयंसेवकांच्या डोक्यात वरचेवर येत आहे.