शिवाजी महाराजांचा पुतळा हलवल्यानं वातावरण तापलं; शिवप्रेमी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 03:51 AM2020-08-09T03:51:50+5:302020-08-09T06:44:49+5:30
कर्नाटकमधील मनगुत्ती भागातील घटना
बेळगाव : कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती (ता. हुक्केरी) येथील मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात हलविल्यात आल्याने सीमाभागात संताप व्यक्त होत आहे.
मनगुत्ती ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावानुसार मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांसह राणी चन्नम्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वाल्मिकी अशा महापुरुषांचे समान उंचीचे पुतळे उभारण्याचे ठरले आहे. त्यानुसार गावातील काही युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला होता. मात्र एका गटातील युवकांनी त्यास विरोध करत पुतळा काढण्यासाठी दबाव सुरूकेला. राज्य सरकारच्या आदेशानंतर शुक्रवारी रात्री पोलीस बंदोबस्तात पुतळा हलविण्यात आला. तणावाच्या पार्श्वभूमीवर गावात पोलीस बंदोबस्त वाढविला आहे.
मंत्री एकनाथ शिंदे यांचे कर्नाटक सरकारला पत्र
सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांना तातडीने यासंदर्भात पत्र पाठविले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.