ममता बॅनर्जींवर संताप अन् खासदारकीचा दिला राजीनामा! कोण आहेत जवाहर सरकार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 05:29 PM2024-09-08T17:29:29+5:302024-09-08T17:31:56+5:30
Who is Jawhar Sircar : कोलकातामध्ये महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी ममता बॅनर्जी सरकारवर संताप व्यक्त केला आणि तडकाफडकी खासदारकीचा राजीनामा दिला.
Jawhar Sircar : कोलकातामधील आरजी कर रुग्णालय आणि महाविद्यालयात एका महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेबद्दल ममता बॅनर्जी आणि राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त करत तृणमूल काँग्रेसचे जवाहर सरकार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे जवाहर सरकार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. ते कोण आहेत, हेच जाणून घ्या.
ममता बॅनर्जींना जवाहर सरकार यांनी काय सुनावले?
जवाहर सरकार यांनी ममता बॅनर्जींना पत्र लिहून संताप व्यक्त केला आहे. "आरजी कर रुग्णालयात झालेल्या भयंकर घटनेपासून मी महिनाभर संयम पाळला. आंदोलन करणाऱ्या कनिष्ठ डॉक्टरांसोबत ममता बॅनर्जी पूर्वीप्रमाणे हस्तक्षेप करतील, अशी आशा मला होती. असे झाले नाही. सरकार ज्या उपाययोजना करत आहे, त्या तोकड्या असून, त्यालाही उशीर झाला आहे. मला वाटतं की, जर भ्रष्ट डॉक्टरांचा ग्रुप तोडले गेले असते आणि दोषींना तात्काळ शिक्षा झाली असती, तर या राज्यात खूप आधीच परिस्थिती सामान्य झाली असती", अशा शब्दात जवाहर सरकार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
खासदारकीचा राजीनामा, राजकीय संन्यासाची घोषणा
तृणमूल काँग्रेसचे जवाहर सरकार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देताना राजकीय संन्यासाचीही घोषणा केली. जवाहर सरकार यांनी अनेक पदांवर काम केले आहे. जवाहर सरकार हे आयएएस अधिकारी होते.
1975 मध्ये ते IAS सेवेत दाखल झाले होते. 2012 ते 2016 या काळात ते प्रसार भारतीचे सीईओ होते. त्यांना सर्वोत्कृष्ट सीईओ म्हणूनही गौरवण्यात आलेले आहे.
जवाहर सरकार केंद्रात होते सचिव
2008 ते 2012 या काळात जवाहर सरकार हे भारत सरकारमध्ये सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये महत्त्वाच्या खात्याचे सचिव म्हणून काम केले आहे. निवृत्तीनंतर ते तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेचे खासदार बनले. 2021 मध्ये ते पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडले गेले होते.
जवाहर सरकार यांचे शिक्षण
72 वर्षीय जवाहर सरकार यांचा जन्म पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरातच झाला होता. त्यांच्या पत्नीचे नाव नंदिता सरकार आहे. त्यांना एक मूल आहे. प्रेसिडन्सी, कँब्रिज आणि Sussex विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. त्यांनी इतिहास आणि समाजशास्त्र या दोन विषयात एमए केले आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.