संतप्त मेहबूबा मुफ्तींनी पत्रकार परिषद संपविली
By admin | Published: August 26, 2016 04:01 AM2016-08-26T04:01:51+5:302016-08-26T04:01:51+5:30
काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा संयम संपला आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबतची संयुक्त पत्रकार परिषद अनपेक्षितपणे संपविली
श्रीनगर : उत्तर देण्यास कठीण प्रश्न विचारण्यात आल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा संयम संपला आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबतची संयुक्त पत्रकार परिषद अनपेक्षितपणे संपविली.
खोऱ्यात सध्या सुरू असलेल्या निदर्शनांबाबत मेहबुबा यांच्या असलेल्या भूमिकेची तुलना त्यांनी २०१० मध्ये खोऱ्यातील अस्वस्थतेबाबत घेतलेल्या पवित्र्याशी करण्यात आल्यानंतर मुफ्ती यांचा संयम संपला. गुरुवारी येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत व्यासपीठावर मुफ्ती यांच्या शेजारी राजनाथ सिंह बसलेले होते.
ते मेहबुबा यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. २०१० मध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना फुटीरवाद्यांना तुरुंगात टाकणे व बळाचा वापर करण्यास मुफ्ती यांनी केलेल्या विरोधाची आठवण वार्ताहराने त्यांना करून दिली होती. ‘मुझे क्या बोलेंगे ये सर. मैने इनके बच्चों को बचाया है टास्क फोर्ससे’, असे मेहबुबा मुफ्ती संतापून म्हणाल्या आणि ‘थँक यू, आता तुम्ही चहा घेऊ शकता’, असे म्हणून पत्रकार परिषद संपविली.
वार्ताहराने २०१० मधील आंदोलनाबाबत तुमची भूमिका काय होती, असे विचारल्यावर मुफ्ती चिडलेल्या दिसल्या. तेव्हा अब्दुल्ला सरकारने मुलांविरुद्ध केलेला बळाचा वापर आणि हुरीयत कॉन्फरन्सच्या नेत्यांना केलेली अटक याबद्दल मुफ्ती यांनी प्रश्न उपस्थित केले होते. ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी आपापल्या केवळ जागा बदलल्या आहेत, असेही या वार्ताहराने सांगितले. मेहबुबा म्हणाल्या, ‘‘हे विश्लेषण चुकीचे आहे. २०१० मध्ये मछीलमध्ये बनावट चकमक घडविण्यात आली होती व तिच्यात नागरिक ठार झाले होते. त्यानंतर शोपियानमध्ये बलात्कार आणि खून झाल्याचे आरोपही झाले होते.’’
दरम्यान काश्मीरसंदर्भात राजनाथ सिंह यांच्या विधानाचे काँग्रेसने गुरुवारी स्वागत केले. सरकारची काश्मीरबाबतची आक्रमक भूमिका मवाळ झाल्याचे दिसते, असे सांगून काँग्रेसने स्वत: पंतप्रधानच सर्व संबंधितांशी चर्चेच्या माध्यमातून संवाद साधण्यास पुढाकार घेतील अशी आशा व्यक्त केली. काश्मीर खोऱ्यातील गेल्या ४८ दिवसांपासूनची अशांतता संपविण्यासाठी खुल्या मनाने संवाद साधण्यात यावा, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. खोऱ्यातील लोकांशी संवाद साधण्यासाठी सगळ््या पक्षांचा प्रक्रियेत सहभाग हवा या राजनाथ सिंह यांच्या विधानाचे सुरजेवाला यांनी स्वागत केले. गृहमंत्री आपल्या शब्दांना प्रत्यक्ष कृतीत आणून दु:खावर फुंकर घालणार असतील तर आम्ही व प्रत्येक भारतीय त्याचे स्वागतच करू, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
>पुलवामा जिल्ह्यात संचारबंदी कायम
पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी संचारबंदी वाढविण्यात आली तर श्रीनगर आणि अनंतनाग जिल्ह्यातील काही भागांत ती लागू आहे. काश्मीर खोऱ्यात चारपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यावरील (जमावबंदी) मात्र गेल्या ४८ दिवसांपासून बंधने कायम आहेत.
पुलवामामध्ये सुरक्षा दलांशी बुधवारी झालेल्या चकमकीत युवक ठार झाल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. श्रीनगर शहरातील परिस्थितीत काहीशी सुधारणा झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी मंगळवारी बऱ्याच भागातील संचारबंदी मागे घेतली.