नाराज पोलिसांचा राजनाथ सिंह यांना 'सॅल्यूट' करण्यास नकार, कारवाईची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 10:49 AM2017-10-17T10:49:42+5:302017-10-17T10:51:08+5:30
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या जोधपूर दौ-यादरम्यान गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी उपस्थित राहायचं होतं. मात्र कॉन्स्टेबल अनुपस्थित राहिल्याने दुस-या कर्मचा-यांनी उपस्थित राहून प्रक्रिया पार पाडली.
जयपूर - पगारात होणा-या कपातीच्या विरोधात राजस्थान पोलीस दलातील जवळपास 250 कॉन्स्टेबल एक दिवसाच्या सुट्टीवर गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यामधील काही कॉन्स्टेबल्सना सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या जोधपूर दौ-यादरम्यान गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी उपस्थित राहायचं होतं. मात्र कॉन्स्टेबल अनुपस्थित राहिल्याने दुस-या कर्मचा-यांनी उपस्थित राहून प्रक्रिया पार पाडली. अधिकारी मात्र पगारातील कपात ही अफवा असल्याचा दावा करत आहेत.
जोधपूर पोलीस आयुक्त अशोक राठोड यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, 'जवळपास 250 हून जास्त पोलीस कर्मचारी सोमवारी सामूहिक रजेवर गेले होते. सुट्टी मंजूर झाली नसतानाही हे कर्मचारी सुट्टीवर गेले. यामधील काहीजणांना राजनाथ सिंह यांना सलामी देण्याची ड्यूटी लावण्यात आली होती. मात्र त्यांनी येण्यास नकार दिला. अखेर आम्हाला नाईलाजाने दुस-या पोलीस कर्मचा-यांकडून सलामी द्यावी लागली.
अशोक राठोड यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'हा गंभीर मुद्दा आहे, आणि दोषींविरोधात कारवाई केली जाईल'. दुसरीकडे राजस्थानचे डीजीपी अजित सिंह यांनी सांगितलं आहे की, 'अशा प्रकारचा बेशिस्तपणा स्विकारला जाणार नाही. हे कर्मचारी पगारात होणा-या कपातीच्या अफवेनंतर निदर्शन करत आहेत'. सध्या या कर्मचा-यांचा पगार महिना 24 हजार रुपये असून, राज्य सरकार कपात करत 19 हजार करणार असल्याची माहिती आहे.
डीजीपी अजित सिंह यांनी सोमवारी पोलीस महाअधिक्षक आणि जिल्हा अधिक्षकांना पत्र लिहून निदर्शन करणा-या कर्मचा-यांसोबत चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे.
मोदींविरोधात सोशल मीडियावर लिहिणारा पोलीस निलंबित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिल्याने अहमदनगर जिल्ह्यात पोलिसाचं निलंबन करण्यात आलं. रमेश शिंदे असे या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून शनिवारी त्याला निलंबन करण्यात आल्याचं समजतय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून रमेश शिंदे हे कार्यरत आहेत. शिंदे यांनी व्हॉट्सअॅपवरुन मोदींविरोधातील आक्षेपार्ह लिखाणाचा मजकूर इतर गृपवर पाठवला होता. हा मजकूर अनेक गृपवर व्हायरल झाल्याच्या तक्रारीनंतर सायबर विभागाने चौकशी केली.
दुसरीकडे आसाममध्ये प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करणा-या सीआरपीएफ जवानाला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठीडत पाठवण्यात आलं आहे. पंकज मिश्रा असं त्याचं नाव असून, रविवारी त्याला अटक करण्यात आली होती.