नूपुर शर्माच्या अटकेसाठी देशात विविध ठिकाणी संतप्त निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 07:12 AM2022-06-11T07:12:17+5:302022-06-11T09:37:00+5:30

Nupur Sharma : शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर मुस्लीम समाजाच्या लोकांनी रस्त्यावर उतरून दिल्ली, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, तेलंगणा, पंजाब, मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातील काही शहरांत नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरोधात निदर्शने  केली.

Angry protests in various parts of the country over the arrest of Nupur Sharma | नूपुर शर्माच्या अटकेसाठी देशात विविध ठिकाणी संतप्त निदर्शने

नूपुर शर्माच्या अटकेसाठी देशात विविध ठिकाणी संतप्त निदर्शने

googlenewsNext

नवी दिल्ली :  एका विशिष्ट धर्माविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांच्या अटकेची मागणी करीत शुक्रवारी मुस्लीम समाजाच्या लोकांनी  देशांतील काही राज्यांत विविध ठिकाणी निदर्शने, घोषणाबाजी केली. यादरम्यान, काही ठिकाणी गोळीबार, दगडफेकीच्या घटना घडल्या. 

 शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर मुस्लीम समाजाच्या लोकांनी रस्त्यावर उतरून दिल्ली, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, तेलंगणा, पंजाब, मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातील काही शहरांत नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरोधात निदर्शने  केली. दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीबाहेर शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर जमलेल्या जमावाने नूपुर शर्मा व नवीनकुमार जिंदल यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करीत शांततेत निदर्शने केली. 

डोडा, किश्तवाडमध्ये संचारबंदी...
भाजप नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील डोडा, किश्तवाडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. भद्रवाह आणि किश्तवाडमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, काश्मीरच्या काही भागांतही मोबाइल इंटरनेट बंद करण्यात आले आहे. श्रीनगरसह काश्मीरच्या काही भागांत बंदसारखी स्थिती आहे.  चौकाचौकात पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. भद्रवाहमध्ये दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या. निर्बंधाचे उल्लंघन करीत काही लोक रस्त्यावर आले आणि घोषणाबाजीदरम्यान दगडफेक केली. या प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर झळकल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशात सहा शहरांत निदर्शने
उत्तर प्रदेशातील प्रयागराज, सहारनपूर, बाराबंकी, मुरादाबाद, उन्नाव, देवबंदसह अनेक शहरात भाजपच्या दोन नेत्यांविरुद्ध निदर्शन केली. सहारनपूरमध्ये तोडफोड आणि प्रयागराजमध्ये दगडफेकीची घटना घडली. प्रयागराजमध्ये निदर्शकांनी प्रादेशिक सशस्र पोलीस दलाचे वाहन जाळले. अनेक ठिकाणी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
कर्नाटकातील बेळगावीमध्ये फोर्ट रोडवर वीज वाहक तारेला नूपुर शर्माचा पुतळा फासावर लटकावण्यात आला होता. तथापि, पोलिसांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हा पुतळा तातडीने हटविला.

कोलकात्यामध्ये घोषणाबाजी
पश्चिम बंगालच्या कोलकाता आणि हावडामध्ये निदर्शकांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली.  काही निदर्शकांनी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. निदर्शकांंना पांगविण्यासाठी  अश्रुुधुराच्या माऱ्यासोबत लाठीमार करावा लागला.

रांचीत एकाचा मृत्यू...
झारंखडची राजधानी असलेल्या रांची शहरातील मुख्य रस्त्यावर उतरून जमावाने घोषणाबाजी करीत निदर्शन केली. संतप्त जमावाला नियंत्रित करताना पोलिसांना लाठीमार आणि हवेत गोळीबार करावा लागला. निदर्शकांपैकी  एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तथापि, पोलिासांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. निदर्शकांनी गोळीबाराच्या २५ फैरी झाडल्या. 
जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पोलिसांनी १५० फैरी हवेत झाडल्या. पोलिसांनी गोळीबार केला नसता, तर स्थिती नियंत्रणाबाहेर गेली असती. रांची शहरातील सुजाता चौक ते फिरायालाल चौकांपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  

बिहारमध्येही घोषणाबाजी
बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातही घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. नूपुर शर्मांच्या अटकेची मागणी करणारे फलक लावले होते. जिल्ह्यातील दोन बाजार बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, मुझफ्फरपूरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून नूपुर शर्मा, नवीन जिंदाल आणि  स्वामी यती नरसिंहानंद यांच्याविरुद्ध  तक्रार दाखल केली आली आहे. कोर्ट यावर २१ जून रोजी सुनावणी घेणार आहे.

Web Title: Angry protests in various parts of the country over the arrest of Nupur Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा