अनिल अंबानींच्या उद्योगाला अच्छे दिन आणणार हे 'अनमोल' रत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 12:42 PM2018-04-26T12:42:03+5:302018-04-26T12:45:07+5:30
अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल आणखी दोन कंपन्यांच्या संचालकापदांची जबाबदारी सांभाळणार आहे.
मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाशप्रमाणे अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानीसुद्धा आता उद्योगजगतामध्ये नव्या जबाबदाऱ्या स्वीकारत आहे. रिलायन्स निपॉन लाइफ असेट मॅनेजमेंट (आरएनएएम) आणि रिलायन्स होम फायनान्स (आरएचएफ) या कंपन्यांच्या संचालकपदी अनमोल याची निवड करण्यात आली आहे.
रिलायन्स निपॉन लाइफ असेट मॅनेजमेंट आणि रिलायन्स होम फायनान्स या दोन्ही कंपन्यांच्या संचालकांनी आपापल्या संचालक मंडळांवर अनमोल अंबानी यांची नेमणूक केल्याचे रिलायन्स समुहाच्या रिलायन्स कॅपिटलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
अनमोल अंबानी हा 26 वर्षांचा असून तो रिलायन्स कॅपिटल या कंपनीचा कार्यकारी संचालक आहे. 2016 साली त्याची रिलायन्स कॅपिटलमधील या वरिष्ठ पदावर नियुक्ती करण्यात आली होती. या नव्या जबाबदाऱ्या स्वीकारल्यानंतर अनमोल म्हणाला, रिलायन्स निपॉन लाइफ असेट मॅनेजमेंट आणि रिलायन्स होम फायनान्सला भविष्यात विकासाची मोठी संधी आहे. या संधीचा उपयोग या कंपन्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी होणार आहे.