अनिल अंबानींच्या अडचणींत वाढ; चीनच्या तीन बँकांनी ठोकला तब्बल 48 अब्जांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 04:03 PM2019-11-09T16:03:59+5:302019-11-09T16:13:19+5:30
आर कॉमवर खटला दाखल करणाऱ्या बँकांमध्ये इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना आहेत.
रिलायन्स एडीएजी समुहाचे मालक अनिल अंबानींच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या अंबानींवर चीनच्या तीन बँकांनी 48.53 अब्ज रुपयांचा दावा ठोकला आहे. या बँकांनी सांगितले की अंबानींची बंद झालेली कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनला 2012 मध्ये 66.03 अब्ज म्हणजचे 92.52 कोटी डॉलरचे कर्ज दिले होते. या कर्जाची परतफेड न केल्याने 2017 पासून बुडीत खात्यामध्ये आहे.
आर कॉमवर खटला दाखल करणाऱ्या बँकांमध्ये इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना आहेत. हा खटला लंडनच्या न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार तीन बँकांनी कर्ज देण्यापूर्वी अंबानींना तारण देण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी ते दिले नाही.
भारतीय व्यापार क्षेत्रामध्ये एक दशक आधीपर्यंत अनिल अंबानींचा दबदबा होता. मार्च 2018 मध्ये रिलायन्स ग्रुपचे एकूण कर्ज 1.7 कोटी रुपये होते. काही महिन्यांपूर्वीच अनिल अंबानींनी सांगितले होते की, 35 हजार कोटींचे कर्ज फेडले आहे.
रिलायन्स विमा पॉलिसीवरही बंदी
भारतीय विमा नियामक मंडळ इरडाने रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (आरएचआयसीएल) वर नवीन पॉलिसी विकण्यावर बंदी आणण्यात आली आहे. ही कंपनी आता जुन्याच ग्राहकांना सेवा देत राहणार आहे. ही कंपनीही आर्थिक संकटात आहे.