Election Commission: ५ मिनिटांत सुनावणी झाली! ठाकरे-शिंदे गटाला पुढच्या वर्षी बोलावले; निवडणूक आयोगात काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 04:17 PM2022-12-12T16:17:46+5:302022-12-12T16:21:07+5:30
Election Commission: शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी पार पडली.
Election Commission: शिवसेना नेमकी कुणाची आणि शिवसेना पक्षचिन्ह याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी घेण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेवर दावा केला होता. शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला मिळावे, अशी मागणीही शिंदे गटाकडून करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार, दिलेल्या कालावधीत दोन्ही गटाकडून कागदपत्रे जमा केल्यानंतर निवडणूक आयोगामध्ये सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी निवडणूक आयोगात ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई उपस्थित होते.
याबाबत माध्यमांशी बोलताना अनिल देसाईंनी सांगितले की, केंद्रीय आयोगासमोर सुनावणी सुरू होण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्तांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर जमा झालेल्या कागपत्रांची छाननी कशी महत्त्वाची असेल, याची माहिती दिली. तसेच दोन्ही बाजूच्या पक्षांचे यासंदर्भात जे अर्ज आले आहेत, त्यावर मुख्य सुनावणी सुरू करायची की, बाजूने ज्या गोष्टी येत आहेत, यावर अधिक माहिती घ्यायची, याबाबत दोन्ही गटांशी चर्चा करून मुख्य सुनावणी पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होईल, असे सांगितले. सोमवारी झालेल्या सुनावणीत युक्तिवाद झालेला नाही, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्य सुनावणी
आम्हाला अपेक्षित होते की, चांगल्या रितीने आम्ही ज्या गोष्टी सादर केल्या आहेत, मूळ दस्तावेज जे दिलेले आहेत, त्या दस्तावेजांची छाननी, त्यामध्ये खरे काय किंवा खोटे काय, ते व्यवस्थित आहेत की नाही, चुकीचे काय किंवा बरोबर काय, या गोष्टींवर प्रकाशझोत टाकला जाईल. मात्र, आता पुढील वर्षीच्या जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत, असे अनिल देसाईंनी सांगितले. तसेच या अर्जांसोबत अन्यही विविध गोष्टी आहेत, त्यांचा ऊहापोह जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील सुनावणीवेळी करण्यात येईल, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे, अशी माहिती देसाई यांनी यावेळी बोलताना दिली.
दरम्यान, ठाकरे गटाकडून ३ लाख प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहे आणि बाकीचे आमचे प्राथमिक सदस्यांची नोंद आहेत, असेही देसाई यांनी सांगितले. दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी दोन्ही गटांकडून १० ते १२ वकिलांची फौज तैनात करण्यात आली होती. तसेच शिंदे गटाकडून कुणीही लोकप्रतिनिधी निवडणूक आयोगात उपस्थित नव्हता, असे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"