तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 07:02 AM2024-09-20T07:02:50+5:302024-09-20T07:03:19+5:30
नायडू राजकीय स्वार्थासाठी अतिशय हीन स्वरूपाचे व खोटे आरोप करत असल्याची टीका वायएसआर काँग्रेस पार्टीने (वायएसआरसीपी) केली आहे.
अमरावती : आंध्र प्रदेशमध्ये मागील राज्य सरकारच्या कार्यकाळात तिरुपती बालाजी देवस्थानतर्फे प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडू बनविण्यासाठी निकृष्ट पदार्थ व प्राण्याच्या चरबीचा वापर सुरू केला होता, असा अहवाल गुजरातमधील प्रयोगशाळेने दिला. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी यासंदर्भात केलेल्या आरोपांना बळकटी मिळाल्याचा तेलुगु देसम पार्टीचा (टीडीपी) दावा आहे. तर नायडू राजकीय स्वार्थासाठी अतिशय हीन स्वरूपाचे व खोटे आरोप करत असल्याची टीका वायएसआर काँग्रेस पार्टीने (वायएसआरसीपी) केली आहे.
गुजरातच्या आणंद येथे असलेल्या सीएएलएफ या संस्थेकडे देवस्थानात बनविण्यात येणाऱ्या लाडूंसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपाचे नमुने तपासण्यासाठी पाठविले होते. ते नमुने तपासले असता त्यात सीएएलएफला माशापासून बनविलेले तेल व प्राण्याच्या चरबीशी संबंधित लाडू यांचे अस्तित्व आढळून आले असा दावा तेलुगु देसम पक्षाचे प्रवक्ते अनाम वेंकट रमणा रेड्डी यांनी केला होता. त्यांनी सीएएलएफचा अहवालही पत्रकार परिषदेत सादर केला होता.
‘नायडूंनी देवतेचा अपमान केला’
लाडू बनवताना प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचा दावा केल्याबद्दल वायएसआरसीपी पक्षाने चंद्राबाबू नायडू यांच्यावर निशाणा साधला आहे. नायडू यांनी देवतेचा अपमान केला असून, त्यांच्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत, असे पक्षाने म्हटले आहे. प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख वाय.एस. शर्मिला यांनी नायडू यांनी केलेल्या दाव्याचा सीबीआय तपास करावा आणि तिरुपती लाडूवरून ‘घृणास्पद राजकारण’ केल्यावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.
आपण देवतेसमोर शपथ घेऊया : सुब्बा रेड्डी
वायएसआरसीपीचे ज्येष्ठ नेते वाय.व्ही. सुब्बा रेड्डी म्हणाले की, भगवंताच्या प्रसादात व भक्तांना दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जाते, असे म्हणणेही अकल्पनीय आहे. व्यंकटेश्वर स्वामींवर माझी श्रद्धा आहे आणि तुम्ही (नायडू) सुद्धा त्यांचे
भक्त असल्याचा दावा करता, त्यामुळे आपण देवतेसमोर शपथ घेऊया. नायडूंचे आरोप राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशाने असून, देवताच नायडू आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करेल, असे ते म्हणाले.