Anita Bose: “माझे वडील जिवंत असते, तर देशाची फाळणी झाली नसती”; नेताजींच्या कन्येनं गांधीजींबाबतही मांडलं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 11:08 AM2022-01-25T11:08:32+5:302022-01-25T11:10:35+5:30
Anita Bose: नेताजी सुभाषचंद्र बोस जिवंत असते, तर देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते का, यावर कन्या अनिता बोस यांनी रोखठोक मत मांडले.
नवी दिल्ली:महात्मा गांधीची माझे वडील नेताजी सुभाषचंद्र बोस यांना राजकारणापासून दूर ठेऊ इच्छित होते. माझ्या वडिलांना देशाची फाळणी मान्य नव्हती. महात्मा गांधीजींशी असलेल्या मतभेदांनतरही नेताजींनी फाळणीचा विरोधच केला असता. माझे वडील जिवंत असते, तर देशाची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली नसती, असे परखड मत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी व्यक्त केले आहे. अनिता बोस सध्या जर्मनीत राहत असून, २३ जानेवारी रोजी इंडिया गेटवर नेताजींचा होलोग्राम पुतळा स्थापन केल्यावर अनिता बोस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
एका वृत्तपत्राशी संवाद साधताना अनिता बोस म्हणाल्या की, भारत सरकारने इंडिया गेटवर नेताजींची प्रतिमा स्थापन केली, याबाबत मला अतिशय आनंद होत आहे. ही स्वागतार्ह बाब आहे, असे त्या म्हणाल्या. अमर जवान ज्योत हटवल्याप्रकरणी काही राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला होता. याबाबत बोलताना अनिता बोस यांनी सांगितले की, आता ज्या ठिकाणी आता पुतळा स्थापन करण्यात आला आहे, ती जागा कायम रिकामी राहावी, असे विरोधकांचे म्हणणे असेल, तर यावर माझ्याकडे उत्तर नाही. देशातील महान व्यक्तींपैकी एकाची प्रतिमा तिथे लावणे योग्य आहे. ती महात्मा गांधी यांचीही असू शकली असती, असे अनिता बोस यांनी स्पष्ट केले.
आझाद हिंद फौजेची स्वातंत्र्य मिळण्यात महत्त्वाची भूमिका
काँग्रेसने नेताजींवर अन्याय केला का, यावर बोलताना अनिता बोस म्हणाल्या की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस सरकारला वाटले की, अहिंसेच्या मार्गामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण यामुळे अन्य स्वातंत्र्य सैनिकांना योग्य मान मिळाला नाही. नंतरच्या कागदपत्रांवरून भारताच्या स्वातंत्र्यात आझाद हिंद फौजेचे योगदान आणि भूमिका महत्त्वाची होती, हेच समोर आले, असे अनिता बोस यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच नेताजींना योग्य सन्मान मिळाला का, यावर काही बोलायचे नाही. पण सात दशकांनंतर नेताजींचा सन्मान केला जातोय तसेच त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचतील, याबाबत समाधान वाटते, असेही त्यांनी नमूद केले.
नेताजी जिवंत असते, तर राष्ट्रपतींचा दर्जा मिळाला असता
नेताजी देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते, याबाबत बोलताना अनिता बोस म्हणाल्या की, नेताजी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळेस काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दर्जा हा राष्ट्रपतीच्या दर्जाप्रमाणे मानला जात असे. भारत सरकारमधील कायद्यानुसार, नेताजींचा दर्जा राष्ट्रपतीपदाएवढा असता. मात्र, आता राष्ट्रपती निवडीची प्रक्रिया वेगळी आहे. नेताजींच्या हिंदुत्वाबाबत बोलताना अनिता बोस म्हणाल्या की, नेताजींचे हिंदुत्वाबाबतचे विचार काय होते, हे मला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. माझ्या मते, धर्म अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र, धर्माच्या नावाखाली चालत असलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत. कोणत्याही एका धर्माला पुढे नेणे, त्याचाच सर्वाधिक पुरस्कार करणे यामुळे दुसऱ्या धर्माला आपण कमी लेखतो, असाही होऊ शकतो आणि हे योग्य नाही. देशातील वातावरण चांगले आणि सकारात्मक राहण्यासाठी या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, असे अनिता बोस यांनी नमूद केले.