अनिताच्या आत्महत्येमुळे संताप; तामिळनाडूमध्ये विविध संघटनांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:50 AM2017-09-03T00:50:35+5:302017-09-03T00:51:00+5:30
डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मोठी जिद्द आणि मेहनतीने बारावी परीक्षेत ९८ टक्के गुण मिळविणाºया दलित कुटुंबातील एस. अनिताने काल, शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे शनिवारी तामिळनाडूत सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
चेन्नई : डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मोठी जिद्द आणि मेहनतीने बारावी परीक्षेत ९८ टक्के गुण मिळविणाºया दलित कुटुंबातील एस. अनिताने काल, शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे शनिवारी तामिळनाडूत सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याच अनिताने ‘नीट’विरुद्ध याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला होता.
विद्यार्थ्यांसह राजकीय व विविध संघटनाही रस्त्यावर उतरल्या आहेत. चेन्नईत विद्यार्थी आणि राजकीय पक्षांच्या वतीने नऊ ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी ८० महिलांसह ४५० निदर्शकांनाअटक केली असून, दोन ठिकाणी पंतप्रधानांच्या प्रतिमेचे दहन केले.
एस. अनिता १७ वर्षांची मुलगी. तिचे वडील रोजंदारीवर मजुरी करतात. डॉक्टर होऊन वडिलांच्या कष्टाचे चीज करायचे तिने ठरविले होते. बारावीत १,२०० पैकी १,१७६ गुण मिळविले. राज्याच्या सीईटीमध्ये मेडिकल आणि इंजिनिअरसाठी अनुक्रमे १९६.७५ आणि १९९.७५ गुण मिळवले. मद्रास इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीत एरोनॉटिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश देऊ करण्यात आला. पशुवैद्यकीय अभ्यासक्रमालाही तिचा नंबर लागला; परंतु डॉक्टर होण्याची तिची जिद्द होती. तथापि, मेडिकल प्रवेशासाठी राष्टÑीय पातळीवरील ‘नीट’ परीक्षेत तिला ७०० पैकी ८६ गुण मिळाले. नीट परीक्षेतून तामिळनाडूला सूट देण्याची शक्यता धूसर झाल्याने तिने अरियालूर जिल्ह्यातील कुळुमूर गावी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
अनिताच्या आत्महत्येने तिच्या गावात राज्यात उद्रेकाची लाट पसरली. दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद करण्यात आली. रस्ते अडवून केंद्र व राज्य सरकारविरोधात लोकांनी संतप्त घोषणाबाजी केली. तिरुनवेली जिल्ह्यात नामा तमिळार कच्ची या संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कोइम्बतूर, रामेश्वरम येथेही युवक संघटनांनी अनिताला न्याय देण्याची मागणी करीत नीट परीक्षा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)
मान्यवरांनी व्यक्त केला शोक
मागच्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला असे निर्देश दिले होते की, नीटच्या प्रावीण्य यादीनुसार एमबीबीएस आणि बीडीएससाठी प्रवेश प्रक्रिया अमलात आणावी.
द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, व्हीसीकेचे तोल तिरूमवलावन, अभिनेते कमल हसन, रजनीकांत यांच्यासह इतर राजकीय पक्ष नेते आणि विविधि मान्यवरांनी अनिताच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारने तिच्या कुटुंबियास ७ लाख रुपयांची मदत आणि अनुकंपेवर सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे.