"मी माझ्या मर्जीने पाकिस्तानात गेली..."; पोलिसांनी अंजूला विचारले 12 प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 10:43 AM2023-12-08T10:43:43+5:302023-12-08T10:44:40+5:30
अंजूची चौकशी करण्यासाठी राजस्थानमधील भिवडी येथील पोलीस हरियाणातील सोनीपतला पोहोचले.
पाकिस्तानातूनभारतात परतल्यानंतर अंजू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अंजूची चौकशी करण्यासाठी राजस्थानमधील भिवडी येथील पोलीस हरियाणातील सोनीपतला पोहोचले. यावेळी पोलिसांनी अंजूला 12 प्रश्न विचारले, अंजूच्या जबाबाचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे. अंजूने पोलिसांना सांगितलं की, ती स्वतःच्या मर्जीने पाकिस्तानात गेली होती. तिचे पती अरविंद याच्याशी मतभेद होते.
भिवडीचे एसपी योगेश दाधीच यांनी सांगितलं की, अंजूचा पती अरविंद याने दाखल केलेल्या एफआयआरबाबत अंजूची चौकशी करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं होतं. या दरम्यान अंजूसोबत जी काही चौकशी झाली त्याची नोंद करण्यात आली आहे. अंजूने चौकशीदरम्यान सांगितलं की, तिचा ख्रिश्चन धर्मावर विश्वास आहे आणि तिला हिंदू धर्माच्या नियमांची माहिती नाही.
अंजूला भेटण्यासाठी तिची मुलगीही सोनीपतला पोहोचली. यानंतर अंजू म्हणाली की, माझी मुलगी मला चांगल्या प्रकारे समजून घेते. यासोबतच अरविंदचे अंजूशी फोनवरही बराच वेळ बोलणे झाले. अंजूशी बोलल्यावर अरविंदचा विचार बदलला. अंजूवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेतला जाईल असंही अरविंदने म्हटलं आहे. मुलांना जे हवे ते होईल. त्यांच्यावर सर्व अवलंबून आहे असं म्हटलं.
अरविंदने अंजू आणि नसरुल्लाविरुद्ध भिवडीतील फुलबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यात अरविंदने म्हटलं होतं की, लग्न होऊनही अंजूने मला आणि मुलांना विनाकारण सोडलं, यामुळे मानसिक आघात झाला आहे.
नसरुल्लावर आरोप करताना अरविंदने तक्रारीत म्हटलं आहे की, नसरुल्लाह याला अंजू विवाहित असून तिला दोन मुलं आहेत हे माहीत होतं, तरीही त्याने अंजूला फूस लावून तिला खोटी स्वप्ने दाखवून पाकिस्तानला बोलावलं. अंजूने मला फोन करून धमकी दिल्याचंही अरविंदने तक्रारीत म्हटलं आहे.
अंजूच्या मुलांनी भेटण्यास दिला होता नकार
अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला आणि फातिमा झाली. यानंतर तिने तिचा फेसबुक मित्र नसरुल्लाह याच्याशी निकाह केला. पाकिस्तानातून परतल्यानंतर ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या अंजूच्या वडिलांनी सांगितलं होतं की, माझा अंजूशी कोणताही संबंध नाही. मुलांनी अंजूला भेटण्यास नकार दिल्याचेही पती अरविंदने सांगितले.