पाकिस्तानने अंजूला दिला 1 वर्षाचा व्हिसा; भारतात परतण्याची शक्यता कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 08:46 PM2023-08-07T20:46:44+5:302023-08-07T20:47:13+5:30
मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेलेल्या अंजूने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
इस्लामाबाद : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची जोरदार चर्चा सुरू आहे. अंजू फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली आणि तिथेच तिने इस्लाम स्वीकारुन त्याच्याशी लग्न केले. सुरुवातीला अंजूला एक महिन्याचा व्हिसा मिळाला होता, पण आता पाकिस्तानने तिला 1 वर्षाचा व्हिसा दिला आहे. व्हिसाची मुदतवाढ मिळाल्यामुळे अंजू भारतात परतण्याची शक्यता फार कमी आहे.
पाकिस्तानात गेल्यानंतर अंजूने नसरुल्लाहसोबत लग्न केले आणि इस्लाम स्वीकारुन फातिमा बनली. तिच्या व्हिसाची मुदत संपणार होती, मात्र पाकिस्तानने तिला मुदतवाढ दिल्यामुळे आता ती नसरुल्लाची पत्नी म्हणून पाकिस्तानातच राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने नसरुल्लाहच्या विनंतीवरून तिच्या व्हिसाची मुदत वाढवली आहे. खुद्द नसरुल्लाहने ही माहिती दिली आहे.
नसरुल्लाह काय म्हणाला
नसरुल्लाह म्हणाला, मी इस्लामाबादला माझी पत्नी अंजू (फातिमा) हिचा व्हिसा वाढवण्यासाठी आलो होतो. मंत्रालयाने विचारलेल्या आवश्यकता पूर्ण केल्या आहेत आणि अंजूला एक वर्षाचा व्हिसा मिळाला आहे. अंजूला व्हिसा मिळाल्यामुळे तिचा पाकिस्तानमधील मुक्काम वाढवला आहे. दरम्यान, अंजूचा पहिला पती अरविंद याने नसरुल्लाविरुद्ध जयपूरच्या फूलबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अरविंदच्या तक्रारीनुसार, दोघांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही, त्यामुळे सीमेपलीकडील व्यक्तीशी ती लग्न करू शकत नाही, असा दावा अरविंदने केला आहे.