पाकिस्तानात गेलेल्या अंजूसाठी 'अच्छे दिन', तर भारतात आलेल्या सीमासमोर अनेक अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 04:51 PM2023-07-31T16:51:11+5:302023-07-31T16:51:53+5:30
गेल्या काही दिवसांपासून भारतात आलेल्या सीमा आणि पाकिस्तानात गेलेल्या अंजूची बरीच चर्चा होत आहे.
Anju-Seema Haider : मागील काही दिवसांपासून भारतीय माध्यमांमध्ये पाकिस्तानातूनभारतात आलेल्या सीमा हैदर आणि भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजूची कहाणी चर्चेत आहे. दोघींनी प्रेमासाठी देशाच्या सीमा ओलांडल्या. पण, या दोघींचे आयुष्य खूप वेगळे आहे. एकीकडे अंजूचे पाकिस्तानमध्ये अच्छे दिन सुरू झाले आहेत, तर भारतात आलेल्या सीमाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सीमा हैदरवर गुप्तहेर असल्याचा ठपका लागला आहे, तर तिकडे अंजूवर पैशांचा पाऊस पडत आहे.
पाकिस्तानात अंजूचे अच्छे दिन
अंजूने आपल्या पतीला सोडले आणि थेट पाकिस्तान गाठले. अंजूने पाकिस्तानला जाण्यापूर्वी सांगितले होते की, ती फक्त तिच्या मित्राला भेटण्यासाठी तिथे जात आहे. पाकिस्तानात राहण्याचा, लग्न करण्याचा किंवा धर्म बदलण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता. पण तिथे गेल्यानंतर सर्वकाही बदलले. अंजू धर्म बदलून फातिमा बनली आणि तिच्या फेसबुक मित्र नसरुल्लाहसोबत लग्नही केले. लग्न केल्यानंतर अंजूवर भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानी उद्योगपती मोहसिन खान अब्बासीने अंजूला एक मोठा प्लॉट दिला आहे. याशिवाय इतर अनेकजण विविध गिफ्ट्स देत आहेत. अंजूच्या पाकिस्तानी नागरिकत्वाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर तिला तिथे नोकरीही करता येणार आहे.
सीमावर अडचणींचा डोंगर
आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात पोहोचलेल्या सीमा हैदरची सुरुवातीला खूप चर्चा झाली. सर्व मीडियावर फक्त तिच्याच बातम्या झळकत होत्या. सोशल मीडियावरही सीमा ट्रेंड होती. पण, हळुहळू सीमावर गुप्तहेर असल्याचा ठपका बसला. यानंतर उत्तर प्रदेश एटीएसने तिची तासनतास चौकशी केली. एटीएसची चौकशी संपली, पण आता सीमा आणि सचिन मीना यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सचिन एका दुकानात कामाला होता, त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यही रोजंदारीवर काम करता. पण, आता त्यांच्यावर उदरनिर्वाहाचे संकट निर्माण झाले आहे.
सचिन मीनाच्या वडिलांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. कारण, सुरक्षेच्या कारणास्तव मीना कुटुंबातील कुणालाही घराबाहेर जाता येत नाहीये आणि त्यामुळेच त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. एकीकडे अंजू पाकिस्तानात आरामदायी आयुष्य जगत आहेत, तर दुसरीकडे सीमा हैदर आणि सचिनसमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. आता ही दोन्ही प्रकरणांमध्ये पुढे काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.