अण्णा विदेशी एजंट
By admin | Published: March 23, 2015 01:27 AM2015-03-23T01:27:10+5:302015-03-23T01:27:10+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भूसंपादन विधेयकाच्या विरोधात देशभर रान उठविल्याने अडचणीत आलेल्या भाजपाने त्यांना परकीय हस्तक संबोधले.
भाजपाचा मासिकात आरोप :टीम अण्णांविरूद्धही ओकले गरळ
नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भूसंपादन विधेयकाच्या विरोधात देशभर रान उठविल्याने अडचणीत आलेल्या भाजपाने त्यांना परकीय हस्तक संबोधले. मध्यप्रदेशातील भाजपच्या एका मासिकात अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमविरुद्धही गरळ ओकली आहे.
अण्णा हजारे हे विकासाच्या बाजूने नाहीत, तसेच त्यांच्या स्वयंसेवी संस्थेला विदेशातून रसद मिळत असल्याचा आरोपही या मासिकातील (चरैवेती) एका लेखात करण्यात आला आहे.
व्यक्तिश: ते प्रामाणिक असले तरी मोदींच्या नेतृत्वाखाली देशांची चालू असलेली घोडदौड विदेशी शक्तींना रुचलेली नसावी. आपल्या स्वयंसेवीच्या माध्यमातून ते देशाच्या विकासात खोडा घालत आहेत.
काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने भाजपाची ही भूमिका म्हणजे भूसंपादन विधेयकाच्या विरोधातील आंदोलनावरील लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.शुक्रवारी आसाम येथील कृषक मुक्तिसंग्राम परिषदेत बोलताना अण्णा हजारे यांनी भाजप सरकारवर कडाडून हल्ला केला होता. सहा महिने उलटले तरी शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी अच्छे दिन आल्याचे दिसत नाही. श्रीमंतांसाठीच अच्छे दिन आल्याचे दिसते, त्यामुळे आम्ही हे आंदोलन छेडले आहे.