Anna Hazare-Arvind Kejriwal: 'मुख्यमंत्री झाल्यावर तुम्हीही सत्तेच्या नशेत गुंग झालात', अण्णा हजारेंची केजरीवालांवर पत्रातून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 01:48 PM2022-08-30T13:48:47+5:302022-08-30T13:57:41+5:30
Anna Hazare-Arvind Kejriwal: 'ऐतिहासिक चळवळ उद्ध्वस्त करून स्थापन झालेला तुमचा पक्षही इतर पक्षांच्या वाटेवर जाऊ लागला, हे अत्यंत दुःखद आहे.'
Anna Hazare Letter To Arvind Kejriwal: दिल्लीतील मद्य धोरणातील कथित घोटाळ्यावरुन सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे(Anna Hazare) यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात अण्णा हजारे यांनी दारू धोरणावरुन केजरीवालांना फटकारले. अण्णा हजारे म्हणाले की, 'तुमच्या सरकारने लोकांचे जीवन उद्धवस्त करणारे, महिलांवर परिणाम करणारे दारू धोरण आणले. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात कमालीचा फरक आहे.'
'तुम्ही वेगळा मार्ग निवडला'
अण्णांनी पत्रात पुढे लिहिले की, '10 वर्षांपूर्वी 18 सप्टेंबर 2012 रोजी टीम अण्णाची दिल्लीत बैठक झाली होती, त्यावेळी तुम्ही राजकीय मार्ग स्वीकारण्यावर भाष्य केले होते. पण राजकीय पक्ष काढणे हे आपले उद्दिष्ट कधीच नव्हते, हे तुम्ही विसरलात आणि वेगळा मार्ग निवडला. त्यावेळी जनतेच्या मनात टीम अण्णाबद्दल एक विश्वास निर्माण झाला होता. तेव्हा मला वाटले होते की, टीम अण्णाने देशभर फिरून लोकशिक्षण, जनजागृतीचे करायला हवे. या दिशेने काम झाले असते, तर दारूबाबत असे चुकीचे धोरण कुठेही आले नसते.'
Anna Hazare writes to Delhi CM Kejriwal over New Liquor Policy
— ANI (@ANI) August 30, 2022
"Had expected a similar policy(like Maharashtra's). But you didn't do it.People seem to be trapped in a circle of money for power&power for money. It doesn't suit a party that emerged from a major movement,"he writes pic.twitter.com/4yTvc0XI5K
'आप इतर पक्षांप्रमाणेच'
अण्णा हजारे पुढे म्हणतात की, 'सरकार कोणत्याही पक्षाचे असो, सरकारला जनहिताचे काम करण्यास भाग पाडण्यासाठी समविचारी लोकांचा दबावगट असणे गरजेचे होते. तसे झाले असते तर देशात परिस्थिती वेगळी असती आणि गरिबांना फायदा झाला असता. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. तुम्ही, मनीष सिसोदिया आणि अन्य सहकाऱ्यांनी मिळून पक्ष स्थापन केला. ऐतिहासिक चळवळ उद्ध्वस्त करून स्थापन झालेला पक्षही इतर पक्षांच्या वाटेवर जाऊ लागला, हे अत्यंत दुःखद आहे.'
'तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक'
'भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी ऐतिहासिक आणि लोकनियुक्त आंदोलन झाले, त्यात लाखो लोक आले. त्यावेळी तुम्ही लोकायुक्तांची गरज असल्याबद्दल मंचावरून मोठमोठी भाषणे दिली. आदर्श राजकारण आणि व्यवस्थेचे विचार तुम्ही मांडले होते. पण दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही लोकपाल आणि लोकायुक्त कायदा विसरलात. मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्हाला आदर्श विचारसरणीचा विसर पडला. तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे, लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारे दारू धोरण आणले. यावरून तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात तफावत असल्याचे दिसून येते.
'सत्तेच्या नशेत गुंग झालात...'
''स्वराज' नावाच्या पुस्तकात तुम्ही कितीतरी आदर्श गोष्टी लिहिल्या होत्या. तेव्हा तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण राजकारणात गेल्यावर आणि मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही आदर्श विचारसरणीचा विसर पडल्याचे दिसत आहे. जशी दारूची नशा असते, तशीच सत्तेची नशा असते. तुम्हीही अशा सत्तेच्या नशेत गुंग झालात. त्यामुळेच दिल्ली राज्यात तुमच्या सरकारने नवीन दारू धोरण तयार केले. त्यातूनच दारू विक्री आणि मद्यपानाला चालना मिळू लागली. या धोरणामुळे गल्लीबोळात दारूची दुकाने सुरू करता येतील आणि त्यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळेल, ही बाब जनतेच्या हिताची नाही,' असंही अण्णा आपल्या पत्रात म्हणाले.