दिल्लीत या, आपविरोधात आंदोलन करू; भाजपच्या पत्राला अण्णा हजारेंकडून सणसणीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 08:06 AM2020-08-29T08:06:50+5:302020-08-29T08:09:00+5:30

अण्णा हजारेंचा आंदोलनात सहभागी होण्यास स्पष्ट नकार; भाजपला कठोर शब्दांत सुनावलं

Anna Hazare rejects Delhi BJP request to join protest against AAP | दिल्लीत या, आपविरोधात आंदोलन करू; भाजपच्या पत्राला अण्णा हजारेंकडून सणसणीत उत्तर

दिल्लीत या, आपविरोधात आंदोलन करू; भाजपच्या पत्राला अण्णा हजारेंकडून सणसणीत उत्तर

Next

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाविरोधातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पक्षानं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना पत्र लिहिलं होतं. या पत्राला अण्णांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. आपच्या भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी, व्यासपीठावर उपस्थित राहण्यासाठी भाजपनं अण्णांना साद घातली होती. मात्र या आंदोलनात सहभागी होण्यास अण्णांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. सगळे पक्ष सारखेच असतात, असं उत्तर अण्णांनी भाजपला दिलं.

मी कोणत्याही आंदोलनासाठी पुन्हा दिल्लीला येणार नाही, असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. 'भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांच्याकडून मला कोणतंही पत्र मिळालेलं नाही. मात्र माध्यमांमधून मला याबद्दल समजलं,' असं अण्णा म्हणाले. अण्णांनी अप्रत्यक्षपणे भाजप प्रदेशाध्यक्ष गुप्ता यांच्या सल्लागारांच्या विश्वासार्हतेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. २४ ऑगस्टला पाठवलं गेलेलं पत्र मला मिळालेलं नाही, असं ते म्हणाले. 

दिल्ली आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरदेखील अण्णांनी भाष्य केलं. यावेळी अण्णांनी स्वत:ला फकीर म्हटलं. 'सर्वाधिक तरुण सदस्य असण्याचा दावा करणारा पक्ष अण्णा हजारेसारख्या फकीर माणसाला आंदोलनासाठी का बोलावतो आहे? यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय?,' असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. केंद्रात तुमचं सरकार आहे. दिल्ली सरकारचे अनेक विषयदेखील केंद्राच्याच अखत्यारित येतात. सीबीआय आणि दिल्ली पोलिसांवरदेखील तुमचंच नियंत्रण आहे, याची आठवण अण्णांनी भाजपला करून दिली.

भ्रष्टाचार संपवण्यासाठी केंद्र सरकारनं कोणती पावलं उचलली असा प्रश्न अण्णांनी विचारला आहे. 'दिल्ली सरकारनं भ्रष्टाचार केला असेल तर कठोर कारवाई का केली नाही? भ्रष्टाचार दूर होऊन लोकांना दिलासा मिळावा, असं मला वाटतं. मात्र सध्या राजकीय पक्ष सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत दिल्लीला येऊन आंदोलन करून काहीही होणार नाही. चित्र बदलणार नाही,' असं अण्णांनी म्हटलं आहे.

अण्णा हजारेंनी कडक शब्दांत सुनावल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्तांनी प्रतिक्रिया दिली. 'भाजपनं कायम दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला आहे. त्याच हेतूनं आम्ही अण्णांना पत्र लिहिलं. भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनाला गती देण्याचा मानस व्यक्त केला,' असं गुप्ता म्हणाले. 'अण्णांनी २०११ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केलं. त्यातून पुढे आम आदमी पक्षाचा जन्म झाला. मात्र भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्मलेला पक्षच आता भ्रष्टाचारात आकंठ बुडाला आहे, अशी टीका गुप्ता यांनी केली.

Web Title: Anna Hazare rejects Delhi BJP request to join protest against AAP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.