सनातन धर्म मिटवा म्हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांना अन्नामलाईंचं प्रत्युत्तर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 01:35 PM2023-09-03T13:35:15+5:302023-09-03T13:35:55+5:30
Annamalai Hits Back At Udhayanidhi Stalin: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना मच्छर, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनासोबत केल्याने वादाला तोंड फुटले आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना मच्छर, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनासोबत केल्याने वादाला तोंड फुटले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच भाजपाचेतामिळनाडूमधील प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनीही उदयनिधी यांच्यावर जोरदार टीका केली. ही गोष्ट म्हणजे ख्रिस्ती मिशनरींकडून उधार घेतलेल्या विचारांचा प्रचार करण्यासारखं आहे.
चेन्नईतील एका कार्यक्रमामध्ये तामिळनाडू सरकारमधील क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर बोचरी टीका करताना काही गोष्टींना विरोध करता येत नाही तर त्या केवळ संपुष्टात आणल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, मच्छर, मलेरिया किंवा कोरोना यांना आपण विरोध करू शकत नाही. त्यांना संपुष्टात आणावं लागलं. त्याचप्रमाणे आपण सनातन धर्माला विरोध करण्याऐवजी संपवलं पाहिजे.
उदयनिधी स्टॅलिन यांना प्रत्युत्तर देताना अवन्नामलाई म्हणाले की, गोपालपुरम कुटुंबाचा एकमात्र संकल्प आहे तो म्हणजे राज्याच्या जीडीपीपेक्षा अधिक संपत्ती गोळा करणे. उदयनिधी स्टॅलिन, तुमचे वडील किंवा तुमचे विचार हे ख्रिस्ती मिशनरीकडून उधार घेतलेले आहेत. त्या मिशनरींचं ध्येय आपल्या विचारसरणीची पुनरावृत्ती करण्याचं होतं. उदयनिधी यांच्यावर टीका करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, तामिळनाडू ही अध्यात्माची भूमी आहे. जे काम तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता ते म्हणजे अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये माईक पकडणे आणि आपली निराशा व्यक्त करणे.