लालू- केजरीवालांची गळाभेट म्हणजे अण्णांच्या स्वप्नांचा विश्वासघात - शांति भूषण
By admin | Published: November 22, 2015 03:55 PM2015-11-22T15:55:44+5:302015-11-22T18:57:05+5:30
चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव यांची भेट घेऊन अरविंद केजरीवाल यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या स्वप्नांचा विश्वासघात केल्याची टीका 'आप'चे नेत शांति भूषण यांनी सोडले
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव यांची भेट घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या स्वप्नांचा विश्वासघात केल्याचे टीकास्त्र आम आदमी पक्षाचे बंडखोर नेते शांति भूषण यांनी सोडले. केजरीवाल 'आप'ला खाप पंचायतीप्रमाणे चालवत असल्याचा आरोपही देशाचे माजी कायदा मंत्री व आपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या भूषण यांनी केला आहे.
पक्षाचे अनेक निर्णय,मुद्दे याबाबत उघडपणे असहमती दर्शवणा-या शांति भूषण यांनी केजरीवाल हे हुकूमशहा असल्याची टीका केली. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनामुळेच आम आदमी पक्षाचा पाया रचला गेला होता. अण्णांचा भ्रष्टाचारविरोधाचा मुद्दाच पुढे लावून धरत केजरीवाल राजकारणात स्थिर झाले आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र हेच केजरीवाल हुकूमशाह असल्याचा आरोप विरोधक व काही स्वकीय करत असून ते अण्णांची स्वप्न विसरल्याची टीकाही केजरीवाल यांच्यावर होत आहे. नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव यांची गळाभेट घेऊन केजरीवाल यांनी तेच दाखवू दिल्याचा आरोप शांतिभूषण यांनी केला.
मात्र बिहारचे माजी मुख्यमंत्री असलेल्या लालू यादव यांनी केजरीवाल यांची जबरदस्तीने गळाभेट घेतली व राजनैतिक शिष्टाचार पाळण्यासाठी मनात नसतानाही केजरीवालांना त्यांना मिठी मारावी लागली, अशी सारवासारव केजरीवालांचे समर्थक करत आहेत.