भुयारी मार्गांमुळे अॅनी सिन्हा रॉय यांना मिळाली अनोखी ओळख
By admin | Published: April 30, 2016 04:01 AM2016-04-30T04:01:47+5:302016-04-30T04:01:47+5:30
कमेव महिला अभियंता होण्याचा मान पटकावणाऱ्या अॅनी सिन्हा रॉय यांनी दिल्ली मेट्रो रेल्वेच्या भुयारी मार्गाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्यामुळे त्यांच्या कामगिरीला नवी झळाळी लाभली
बंगळुरू : बोगदा बनविण्याचे काम करणाऱ्या देशातील पहिल्या आणि एकमेव महिला अभियंता होण्याचा मान पटकावणाऱ्या अॅनी सिन्हा रॉय यांनी दिल्ली मेट्रो रेल्वेच्या भुयारी मार्गाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्यामुळे त्यांच्या कामगिरीला नवी झळाळी लाभली आहे. नागपूर विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी मिळविणाऱ्या अॅनी यांना पदव्युत्तर पदवी मिळवायची होती; परंतु कुटुंबाचा आर्थिक भार खांद्यावर आल्याने ते शक्य झाले नाही.
भुयारी मार्ग बनविताना आलेले अनुभव त्यांनी अलीकडेच सांगितले. दिल्ली मेट्रोच्या कामाच्या पहिल्या दिवशी त्यांना त्या आता केवळ पाहुण्या आहेत अशा प्रकारची शेरेबाजी ऐकायला मिळाली होती. तेथे काम करणाऱ्या शंभर जणांमध्ये बहुतांश मजूर आणि काही अभियंते होते. फार काळ काम करू शकणार नाही, असा सर्वांचाच होरा होता आणि कारणेही तशीच होती. चौफेर ढिगारे विखुरलेले. बसायला जागा नाही. शौचालये नाहीत. दोनच तासानंतर एका मोठ्या मशीनसमोर उभी होते. मला जमीन खोदायची होती, पण मशीन अडकून पडली होती. जर्मन अभियंता आणि माझ्या बॉसने मला नटबोल्ट उघडण्यासाठी मशीनमध्ये जायला सांगितले. चुकून चेहऱ्याला हायड्रॉलिक आॅईल फासले गेले. त्यावेळी सहकाऱ्यांनी पुढील आयुष्यात चेहरा असाच चमकत राहणार हे बोलून दाखविले होते. आज बोगदा खोदणे हेच माझे जीवन बनले आहे, असे ३५ वर्षीय अॅनी यांनी शुक्रवारी बंगळुरू येथे भूमिगत मेट्रो रेल्वेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. (वृत्तसंस्था)
>‘गोदावरी’ मशीन स्वत:च चालविली...
सॅमिज रोड ते मॅजेस्टिक हा भुयारी मार्ग तयार करताना बंगळुरूमध्ये बोगदा खोदणारी मशीन एकटीने चालविण्याची जबाबदारीही अॅनी यांनी लीलया पेलली होती.
मे २०१५ मध्ये बंगळुरू मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये त्या सहायक अभियंता पदावर काम करीत असताना मशीनची मोडतोड झाली. त्यानंतर त्या दररोज आठ तास बोगद्यात घालवत होत्या.
मी नम्मा मेट्रोसाठी काम करीत असल्याची माहिती लोकांना हेल्मेट आणि जॅकेट या माझ्या पेहरावामुळे मिळाली. हे काम कधी पूर्ण होणार असा त्यांचा प्रश्न असायचा, असे त्यांनी सांगितले.
>खुंटला पुढील शिक्षणाचा मार्ग...
उत्तर कोलकात्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अॅनी यांना वडिलांचे निधन झाल्यामुळे कुटुंबाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढावे लागले. त्यामुळे त्यांनी मास्टर्स पदवी न मिळवता नोकरी पत्करली.
पुरुषांच्या बरोबरीने कामाचा अभिमान...
आजूबाजूला पुरुष असताना त्यांच्या बरोबरीने काम केल्याचा मोठा अभिमान असल्याचे अॅनी सांगतात. उद्या काय याची मला चिंता नाही.
महिलांनी वहिवाट तुडवत पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात त्याच तोडीचे काम करावे. भुयार खोदणारी बोअरिंग मशीन चालवावी लागते.
त्यांनी बोगद्यात काम करावे, अशी इच्छाही अॅनी यांनी बोलून दाखविली. त्या बंगळुरूच्या एचएसआर लेआऊटमध्ये तंत्रज्ञ असलेल्या पतीसह राहतात.