काँग्रेसच्या प्रचार सभेत व्यासपीठावरून अकाली दल जिंदाबादच्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 05:36 AM2019-05-07T05:36:34+5:302019-05-07T05:37:13+5:30
काँग्रेसच्या पतियाळातील प्रचार सभेत व्यासपीठावरूनच अचानक अकाली दल जिंदाबादच्या घोषणा सुरू होताच श्रोते व काँग्रेस कार्यकर्ते गोंधळून गेले. काँग्रेसच्या उमेदवार व मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परणीत कौर येथील उमेदवार आहेत.
- बलवंत तक्षक
चंदीगड : काँग्रेसच्या पतियाळातील प्रचार सभेत व्यासपीठावरूनच अचानक अकाली दल जिंदाबादच्या घोषणा सुरू होताच श्रोते व काँग्रेस कार्यकर्ते गोंधळून गेले. काँग्रेसच्या उमेदवार व मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परणीत कौर येथील उमेदवार आहेत. त्यांनाही हे काय चालले आहे कळेना. या घोषणा देत होते हरमित सिंह पठाणमाजरा.
त्यांनी या घोषणा चुकून दिल्या. त्याबद्दल त्यांनी सर्र्वाची माफीही मागितली, पण त्यांनी या घोषणा सवयीने दिल्या होत्या. तसे ते स्वत:च म्हणाले. पठानमाजरा आतापर्यंत अकाली दलातच होते. ते १६ एप्रिल रोजी काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यांनी अकाली दल झिंदाबादच्या घोषणा देताच, संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्नही केला. नंतर पठानमाजरा म्हणाले की, मला माफ करा, अनेक वर्षे अकाली दलात होतो. त्यामुळे माझ्याकडून ही चूक झाली. त्यानंतर त्यांनी परणित कौर झिंदाबाद व काँग्रेस झिंदाबादच्या घोषणा द्यायला सुरुवात केली.
सवाल विचारणाऱ्या युवकाच्या कानशिलात
संगरुरमध्ये काँग्रेसच्या सभेत माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल यांना पाच वर्षांत तुम्ही काय केले, असे कुलदीप नावाच्या युवकाने विचारले. सभा सुरू असताना सर्वांनी त्याला सभेनंतर विचार असे सांगितले होते. पण सभा संपताच भट्टल तेथून निघू लागल्या, तेव्हा पुन्हा त्यांच्यापाशी जाऊ न त्याने तोच प्रश्न केला. त्यामुळे संतापून त्यांनी कानशिलात वाजवली.