9 मार्चला होईल निवडणुकांची घोषणा, 8 मार्चपूर्वीच उद्घाटनं करून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 08:47 AM2019-03-05T08:47:55+5:302019-03-05T08:50:06+5:30

आपल्या नव्या प्रकल्पांचे पायाभरणी समारंभ 8 मार्चपर्यंत पूर्ण करावेत आणि जे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, त्यांची उद्घाटनेही 8 मार्चच्या आधी करून टाकावीत.

The announcement of elections will be held on 9 March 2019, inaugurated before March 8 says by PMO of india | 9 मार्चला होईल निवडणुकांची घोषणा, 8 मार्चपूर्वीच उद्घाटनं करून घ्या 

9 मार्चला होईल निवडणुकांची घोषणा, 8 मार्चपूर्वीच उद्घाटनं करून घ्या 

Next

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार 9 मार्च रोजी निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होऊ शकते. त्यामुळेच 8 मार्चपर्यंत सर्वच विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटनाची कामे पूर्ण करा, असे आदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच मंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याचे समजते. 

आपल्या नव्या प्रकल्पांचे पायाभरणी समारंभ 8 मार्चपर्यंत पूर्ण करावेत आणि जे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, त्यांची उद्घाटनेही 8 मार्चच्या आधी करून टाकावीत, असे आदेश पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) सर्व मंत्रालयांना दिले आहेत. कारण, लोकसभा निवडणुकांची घोषणा 9 मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहेत. स्वत: पंतप्रधान मोदी 8 मार्चपर्यंत देशातील विविध केंद्रीय प्रकल्पांची उद्घाटने व पायाभरणी समारंभ करण्यात गुंतलेले असतील. त्या निमित्ताने ते सरकारी व्यासपीठावरून विरोधकांवर राजकीय टीकाही करीत आहेत. आचारसंहितेनंतर मोदींना सरकारी व्यासपीठाचा अशा कारणासाठी वापर करता येणार नाही.

रस्ते वाहतूक, रेल्वे, कोळसा, ऊर्जा, दूरसंचार, माहिती-तंत्रज्ञान, पेट्रोलियम, विज्ञान व तंत्रज्ञान, पोलाद, खाण उद्योग, वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया, आरोग्य, तसेच संरक्षण विभागाशी संबंधित प्रकल्पांवर मोदी सरकारने भर दिला होता. त्याचा फायदा निवडणुकांत मिळावा, यासाठीच हे आदेश देण्यात आले आहेत. नितीन गडकरी, पीयूष गोयल, आर. के. सिंह यांचे प्रकल्प प्रामुख्याने पायाभूत सुविधांशी संबंधित असल्याने त्यांवर भर देण्यात आला आहे.
आयोगाने निवडणुकांची घोषणा केली की, आचारसंहिता लगेच लागू होईल आणि मग प्रकल्पांची उद्घाटने वा पायाभरणी समारंभ करता येणार नाहीत. नव्या योजनांचीही घोषणा करता येणार नाही. त्यामुळे नव्या योजनांची घोषणाही लगेच करून टाका, असेही मंत्रालयांना सांगण्यात आले आहे. तर शेतकरी सन्मान योजनेतील दुसऱ्या हफ्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होताच ही घोषणा होऊ शकते. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना नेते आणि कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या तयारीला लागा, असे म्हटले होते. तसेच आगामी 4 ते 5 दिवसांत निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होईल, असेही पवार म्हणाले होते. त्यामुळे याच आठवड्यात निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. तर, राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. 

श्रमयोगी मानधन योजना आज होणार जाहीर?
आपण ज्या उद्घाटन व पायाभरणी कार्यक्रमांना जात आहोत, तिथे संबंधित खात्याच्या मंत्र्याने उपस्थित राहण्याचे कारण नाही. त्याऐवजी तुम्हीच तुमच्या कार्यक्रमांचा धडाका सुरू करा, असे पंतप्रधानांनी कार्यालयामार्फत सर्व मंत्र्यांना कळविले आहे. पंतप्रधान दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून, तिथे ते मंगळवारी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे.
 

Web Title: The announcement of elections will be held on 9 March 2019, inaugurated before March 8 says by PMO of india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.