निरंजनी आखाड्याकडून हरिद्वार कुंभ समाप्तीची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 04:52 AM2021-04-16T04:52:00+5:302021-04-16T04:52:28+5:30
Haridwar Kumbh : हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आतापर्यंत तीन शाहीस्नान झाले असून त्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. या गर्दीतूनच कोरोनाच्या संसर्गाला निमंत्रण मिळून गेल्याची टीका सर्वत्र होऊ लागली होती.
नाशिक/हरिद्वार : हरिद्वार कुंभमेळ्यात उसळलेली भाविकांची गर्दी व त्यातून कोरोनाच्या संसर्गाला मिळणारे निमंत्रण पाहता निरंजनी आखाड्याने कुंभ समाप्तीची घोषणा केली असून आखाडा परिषदेच्या शुक्रवारी (दि.१६) होणाऱ्या बैठकीत कुंभ स्थगितीचा निर्णय व अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आतापर्यंत तीन शाहीस्नान झाले असून त्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. या गर्दीतूनच कोरोनाच्या संसर्गाला निमंत्रण मिळून गेल्याची टीका सर्वत्र होऊ लागली होती. यामुळे निरंजनी आखाड्याचे पंच व सचिव श्रीमहंत रवींद्रपुरी महाराज यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात याबद्दल चर्चा करण्यात आली. साधू-महंतांनी धर्म व प्रजेच्या हिताला प्राधान्य द्यायला हवे, अशी भूमिका सर्वांनी घेतल्याने अखेर रवींद्रपुरी महाराज यांनी आपल्या आखाड्याचा निर्णय स्पष्ट केला. २७ एप्रिल राेजी चैत्री पौर्णिमेला शाही मिरवणूक न काढता स्थानिक संत-महंत फिजिकल डिस्टन्स राखून प्रातिनिधिक स्नान करतील. बाहेरून आलेल्या संत व भाविकांनी आपापल्या गावी परतावे, असे आदेशच त्यांनी दिले आहेत. आखाडा परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री श्रीमहंत हरिगिरी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दरम्यान, आनंद व महानिर्वाणी आखाड्यानेही या निर्णयाशी सहमती दर्शवत हरिद्वार साेडण्याचे निश्चित केल्याचे समजते. शैव पंथीयांच्या सर्वांत मोठ्या जुना आखाड्याची बैठक महामंडलेश्वर अवधेशानंद यांच्या उपस्थितीत शुक्रवारी होत असून तेदेखील असाच निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. तर वैष्णव आखाड्यांच्या श्रीमहंतांनीही कुंभ स्थगितीचा निर्णय दिगंबर आखाड्याला कळविल्याचे समजते. त्यामुळे हरिद्वार कुंभ गुंडाळला जाण्याची शक्यता खात्रीशीर सूत्रांनी बोलून दाखविली आहे.