इसिसकडून हिंद प्रांताची घोषणा; काश्मिरातील पोलिसांनी मात्र दावा फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 05:25 AM2019-05-13T05:25:54+5:302019-05-13T05:26:10+5:30
इसिस या अतिरेकी संघटनेने भारतात नव्या हिंद प्रांताची घोषणा केली आहे. नव्या शाखेचे नाव ‘विलेआ आॅफ हिंद’ (भारत प्रांत) आहे.
श्रीनगर : इसिस या अतिरेकी संघटनेने भारतात नव्या हिंद प्रांताची घोषणा केली आहे. नव्या शाखेचे नाव ‘विलेआ आॅफ हिंद’ (भारत प्रांत) आहे. तथापि, जम्मू-काश्मिरातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हा दावा फेटाळून लावला आहे.
इस्लामी कट्टरवाद्यांवर नजर ठेवून असणाºया ‘साईट इंटेल ग्रुप’च्या संचालक रिता काटज यांनी सांगितले की, इसिसने आपला नवा हिंद प्रांत घोषित केला आहे. इसिसने या शाखेबाबत अधिक माहिती दिली नाही. अशा प्रकारच्या रणनीतीबाबत यापूर्वी इसिसचा प्रमुख अबू बगदादी यांने भाष्य केले होते.
टेलिग्राम या मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून इसिसने १० मे रोजी सांगितले होते की, इसिसचे अतिरेकी काश्मीरच्या अमशिपोरा भागात सुरक्षा दलाशी भिडले. यात काही जणांना मारले, तर काही जखमी झाले. अर्थात, ही चकमक कधी झाली, याबाबत सविस्तर सांगण्यात आले नाही. १० मे रोजी मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले होते की, काश्मीरच्या शोपियांमध्ये चकमकीत एक अतिरेकी ठार झाला. इसिसने नोव्हेंबर २०१७ पासून काश्मिरात भारतीय सुरक्षा दलाविरुद्ध हल्ल्याचे दावे केलेले आहेत.
काश्मीरमधील यापूर्वीचे हल्ले खोरासन प्रांताच्या शाखेशी जोडले गेले होते. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि जवळच्या भूमीवर नजर ठेवण्यासाठी २०१५ मध्ये या शाखेची स्थापना झाली होती. (वृत्तसंस्था)