खासदारांच्या लाचखोरीचा तपास करण्याची घोषणा
By admin | Published: March 17, 2016 03:36 AM2016-03-17T03:36:36+5:302016-03-17T03:36:36+5:30
तृणमूल काँग्रेसच्या पाच खासदारांच्या लाचखोरीसंबंधीचे ‘स्टिंग आॅपरेशन’ बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत गाजले. या प्रकरणाचा आचारसंहिता समितीकडून तपास करण्याची
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या पाच खासदारांच्या लाचखोरीसंबंधीचे ‘स्टिंग आॅपरेशन’ बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत गाजले. या प्रकरणाचा आचारसंहिता समितीकडून तपास करण्याची घोषणा लोकसभेत अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी बुधवारी केली. लाच घेतल्याचे आरोप अतिशय गंभीर असून, त्यामुळे संसदेच्या विश्वासार्हतेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यसभेत माकपच्या सदस्यांनी लाचखोरीसंबंधी तपास म्हणजे सरकार आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील ‘मॅच फिक्सिंग’ असल्याचा आरोप केल्याने चांगलाच गदारोळ झाला.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर सुुमित्रा महाजन यांनी आचारसंहिता समिती स्थापण्याची घोषणा केली.
तृणमूलच्या खासदारांनी एका कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी पैसे घेतल्यासंबंधी स्टिंग आॅपरेशन समोर आल्यानंतर मंगळवारी संसदेत भाजप, काँग्रेस आणि माकपच्या सदस्यांनी एकजूट दाखवीत तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांना घेरले होते.
या प्रकरणी तपास होण्याची गरज आहे, असे सांगत सुमित्रा महाजन यांनी लोकसभेतील भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वातील १५ सदस्यीय समिती या प्रकरणाचा अभ्यास आणि तपास करून अहवाल सादर करील, असे सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कसे आहे स्टिंग आॅपरेशन
काही दिवसांपूर्वी एका पोर्टलने तृणमूल काँग्रेसचे सौगत राय, सुल्तान अहमद, सुखेंद्र अधिकारी, काकोली घोष दस्तीदार आणि प्रसून बॅनर्जी तसेच राज्यसभा सदस्य मुकुल रॉय हे एका कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी नोटांची बंडले घेत असल्याचे दृश्य दाखविले होते. पैसे देत असलेले अधिकारी बनावट असल्याचा दावा सदर पोर्टलने केला होता.
लाचखोरीच्या गंभीर आरोपांची संयुक्त संसदीय समितीकडून (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी माकपच्या सदस्यांनी राज्यसभेत केली. स्टिंग आॅपरेशनचा व्हिडिओ खरा आहे काय? हा प्रश्नच आहे, असा सवाल तृणमूलचे डेरेक, ओ ब्रायन यांनी केला.