‘बेनामी’वर घाला घालणार
By admin | Published: December 26, 2016 05:22 AM2016-12-26T05:22:36+5:302016-12-26T05:22:36+5:30
बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायदा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक वर्षे दाबून ठेवला, असा आरोप करतानाच
नवी दिल्ली : बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायदा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक वर्षे दाबून ठेवला, असा आरोप करतानाच, आता तो अधिक कठोरपणे लागू करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, ‘नोेटाबंदीच्या घोषणेच्या दिवशीच मी म्हणालो होतो की, ही लढाई असामान्य आहे. ७० वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या काळ्या व्यवहारात कोण-कोण जोडले गेलेले आहे? अशा लोकांशी दोन हात करण्याचे मी ठरविले आहे, तर असे लोकही सरकारला पराजित करण्यासाठी दररोज नव्या युक्त्या अवलंबित आहेत. त्यासाठी आम्हालाही त्यांच्याविरुद्ध नवी पद्धत वापरावी लागते.’
मोदी म्हणाले की, ‘आपल्या देशात बेनामी मालमत्तेबाबत एक कायदा आहे. १९८८ मध्ये हा कायदा तयार झालेला आहे, पण तो तसाच पडून आहे. आम्ही आता अधिक कठोरपणे तो आणणार आहोत. भ्रष्टाचार आणि काळा पैसा याविरुद्धच्या महायज्ञात लोकांनी उत्साहात सहभाग घेतला आहे. जर सभागृहाचे कामकाज चालले असते, तर चांगली चर्चा झाली असती असे सांगून ते म्हणाले की, राजकीय निधीबाबत सभागृहात चर्चा व्हावी, अशी आपली इच्छा होती.
मोदी म्हणाले की, काही लोक अफवा पसरवीत आहेत की, राजकीय पक्षांना सर्व सूट आहे; पण हे चूक आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. दरम्यान, सातत्याने बदलत असणाऱ्या नियमांबाबतही विचारणा होत आहे; पण लोकांच्या सोयीसाठीच हे नियम वारंवार बदलले जात आहेत. आपण सध्या विविध माध्यमांतून हे बघत असाल की, रोज नवनवे लोक पकडले जात आहेत. नोटा पकडल्या जात आहेत. छापे मारले जात आहेत. हे कसे शक्य झाले? नोटाबंदीनंतर अनेक अफवा पसरल्या. म्हणे, नोटेवरील स्पेलिंग चुकीचे आहे, कोणी म्हणते की, मिठाचे दर वाढले. दोन हजार रुपयांची नोटही जाणार आहे. ५०० आणि १०० च्या नोटाही जाणार आहेत; पण या अफवांनंतरही देशवासीयांनी जे सामर्थ्य दाखविले त्याला मी शतशत नमन करतो.
क्रिकेट, हॉकी संघाचे केले कौतुक
‘मन की बात’ या कार्यक्रमात मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघ व ज्युनिअर हॉकी संघाचे अभिनंदन केले. भारतीय क्रि केट संघाने इंग्लंडवर ४ -० असा विजय मिळविला आहे, तर, ज्युनिअर हॉकी संघ विश्वविजेता ठरला आहे.