सीमा सुरक्षेसाठी आणखी ११ हजार महिला
By admin | Published: May 18, 2015 02:44 AM2015-05-18T02:44:52+5:302015-05-18T02:44:52+5:30
सीमेवरील तैनाती, तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठीच्या बंदोबस्तासाठी केंद्रीय सुरक्षा दलात ११ हजारांपेक्षा अधिक महिलांची भरती करण्याचा
नवी दिल्ली : सीमेवरील तैनाती, तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठीच्या बंदोबस्तासाठी केंद्रीय सुरक्षा दलात ११ हजारांपेक्षा अधिक महिलांची भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय सुरक्षा दलांत महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या हेतूने लवकरच ही भरती केली जाणार आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. यावर्षी कॉन्स्टेबल रूपात ६२ हजारांपेक्षा अधिक युवा पुरुष व महिलांची भरती करण्याची घोषणा सरकारने अलीकडेच केली होती. यापाठोपाठ केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि भारतीय तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी)सारख्या निमलष्करी दलांमध्येही ८५३३ महिला कॉन्स्टेबल भरती करण्याचीही सरकारची योजना आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने सशस्त्र सीमा दलात २१ नव्या तुकड्या (कंपन्या) उभारण्यास आणि एकूण २७७२ महिला कर्मचाऱ्यांची भरती करण्यास मंजुरी दिली आहे.
येत्या काळात केंद्रीय दलांत महिलांचे प्रतिनिधित्व पाच टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी महिलांची भरती केली जात आहे. सद्य:स्थितीत या दलांमध्ये महिलांची संख्या एकूण संख्येच्या केवळ २.१५ टक्के आहे. सीआरपीएफमध्ये दोन महिला बटालियन वाढविण्यास गृहमंत्रालयाने विशेष मंजुरी दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)