स्विस बँकेत आणखी ११९५ भारतीय नावे

By admin | Published: February 10, 2015 03:12 AM2015-02-10T03:12:43+5:302015-02-10T03:12:43+5:30

एचएसबीसीच्या स्वित्झर्लंडमधील प्रायव्हेट बँकिंग विभागातील खात्यांमध्ये आणखी ११९५ भारतीयांची नावे असून, त्यांच्या नावावर एकूण

Another 1195 Indian names in Swiss Bank | स्विस बँकेत आणखी ११९५ भारतीय नावे

स्विस बँकेत आणखी ११९५ भारतीय नावे

Next

नवी दिल्ली : एचएसबीसीच्या स्वित्झर्लंडमधील प्रायव्हेट बँकिंग विभागातील खात्यांमध्ये आणखी ११९५ भारतीयांची नावे असून, त्यांच्या नावावर एकूण २५ हजार ४२० कोटी रुपये जमा असल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. इंडियन एक्स्प्रेसच्या या वृत्ताच्या तपशिलाची शहानिशा करण्याची ग्वाही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी दिली. प्रसिद्ध झालेल्या यादीतील बहुतांश नावांची सरकारला कल्पना आहे, आणखी काही नावांची शहानिशा केली जाईल. पण नुसती नावे पुरेशी नसून त्यासाठी पुरावा गरजेचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
बडे उद्योगपती आणि काही राजकारण्यांची नावे नव्या यादीच्या रूपाने चर्चेत आली आहेत. बड्या व्यावसायिकांमध्ये बिझनेस टायकून नरेश गोयल, यशोवर्धन बिर्ला, राजन नंदा, अनुप मेहता, रुसेल मेहता, चेतन मेहता, सौनक पारिख, आनंदचंद बर्मन, गोविंदभाई काकडिया, हिरे व्यापारी कुणाल शाह, चंद्रू लच्छमनदास मेहता, दत्तराज सालगावकर, भद्रशाम कोठारी, श्रवण गुप्ता यांच्या नावाचा समावेश आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे, पुत्र नीलेश राणे, दिवंगत नेते वसंत साठे यांचे कुटुंबीय, माजी मंत्री प्रणीत कौर, काँग्रेसचे माजी खासदार अन्नू टंडन या राजकारण्यांच्या नावाचा समावेश असल्याचे वृत्तात म्हटले आहे. स्मिता ठाकरे तसेच नीलम राणे व नीलेश राणे यांनी मात्र वृत्ताचे सपशेल खंडन केले आहे.
‘कंसोर्टियम आयईसीआयजे’ या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय मंडळाच्या हवाल्याने ही नावे जारी करण्यात आली आहेत. त्यात भारतातील बड्या उद्योगसमूहांसह काही राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट करताना जेटली म्हणाले, की एचएसबीसी बँकेत खाते असलेल्या ६० जणांवर कर खात्याने खटला चालविला असून सोमवारी सरकारने गेल्या सहा-सात महिन्यांपासून काळा पैसा बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम चालविले आहेत.
एचएसबीसीच्या यापूर्वीच्या यादीत ६२८ नावांचा समावेश आहे. ११९५ नवी नावे म्हणजे पूर्वीच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट नावे होतात. फ्रान्स सरकारने २०११ मध्ये पहिली यादी दिली होती. सरकारने यापूर्वीच ६० बेकायदा खातेधारकांवर खटला दाखल केला असून ३५० खातेधारकांना दंड ठोठावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आणखी काही नावे बाहेर आणण्यासाठी महसूल विभाग संपर्कात आहे. पहिल्या यादीतील नावे ही एचएसबीसी या एका बँकेतील आहेत. ती सर्व स्वीस बँकांमधील नावे नाहीत. चार-पाच वर्षांपूर्वी भारत सरकार आणि महसूल विभागाने त्याबाबत संपर्क केला होता. एकूण ६२८ खात्यांबद्दल माहिती मिळाली आहे. यात काही केवळ नावे आहेत मात्र त्यांच्या खात्यांची ओळख दिलेली नाही. दुसरीकडे काही खाती समोर आलेली नाहीत,असा खुलासाही जेटलींनी केला.
गोव्याचे उद्योगपती दत्तराज साळगावकर यांच्या पत्नी दिप्ती साळगावकर यांचेही विदेशात एचएसबीसीत खाते असल्याचे उघड झाले आहे.
विदेशात बँक खाते असलेल्या राधा तिंबले यांच्यानंतर साळगावकर या दुसऱ्या गोमंतकीय महिला ठरल्या आहेत. दत्तराज साळगावकर, त्यांच्या पत्नी तसेच त्यांची मुले विक्रम व ईशाता या चौघांच्याही नावे विदेशात बँक खाती आहेत.
मात्र, केवळ दिप्ती यांच्याच बँक खात्यात पैसे आहेत. इतरांच्या नाहीत. २००६-०७ मध्ये दिप्ती यांच्या खात्यात
५.१७ मिलियन डॉलर म्हणजे ३२ कोटी रुपये आहेत, अशी माहिती उघड झाली आहे.
विदेशात खाती असलेल्यांच्या काळ्या पैशांचा विषय एम. बी. शहा यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटी हाताळत आहे.

> नावे जाहीर करा - आप
विदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांची नावे जाहीर करा अशी मागणी आम आदमी पार्टीने (आप) केली आहे. नवी नावे जाहीर झाल्यामुळे पक्षाने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असल्याचे आपचे नेते योगेंद्र यादव यांनी म्हटले. तत्पूर्वी एचएसबीसीच्या अधिकाऱ्यांवर भाजप आणि काँग्रेसने कारवाई केली नसल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी टिष्ट्वटरवर केला.

> खाती वैध असण्याची शक्यता...
अनेक नावे यापूर्वीच जाहीर झाली असून काही नव्या नावांची भर पडली आहे. त्यात काही बडे उद्योगपती, राजकारणी, अनिवासी भारतीय आणि इतरांचा समावेश आहे. यातील बहुतांश खाती वैध असू शकतात. गेल्या महिन्यात डाव्होसमध्ये स्वीत्झर्लंडच्या अर्थमंत्र्यांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. खात्यांचा तपशील तपासण्यासाठी आणखी पुराव्यांवर विचार करण्यावर त्यांनी सहमती दर्शविली होती. एचएसबीसीच्या स्वीस शाखेने उघड केलेली नावे जागतिक खातेधारांच्या यादीचा एक भाग असून त्यांनी गुंतवलेली रक्कम २००६-०७ या वर्षांतील आहे. त्यात २०० देशांच्या खातेधारकांचा समावेश आहे. या खात्यांवर मिळून १०० अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त रक्कम जमा दाखविण्यात आली आहे.
स्वीस बँकेत बेकायदा खाती असल्याचा इन्कार जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल, अनिवासी भारतीय उद्योगपती स्वराज पॉल यांनीही केला आहे. इम्मार एमजीएफ आणि डाबर समूहाचे प्रमुख बर्मन यांच्या कुटुंबीयांनी भाष्य टाळले.

> एसआयटीची नव्या यादीबाबत बैठक एचएसबीसी तसेच अन्य ठिकाणच्या खात्यांतील अन्य समोर न आलेली नावे उघड करण्याबाबत सूत्रांशी (व्हिसल ब्लोअर)संपर्क साधला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास चमूने(एसआयटी) नव्या यादीबाबत सोमवारी एका बैठकीत चर्चा केली.
केवळ १०० नवी नावे असू शकतात असा अंदाजही वर्तवला. काळा पैसा गुंतवण्यात आल्याबद्दल पुरावे असल्यास आम्ही नव्या प्रकरणांचा तपास करू. ३१ मार्चपर्यंत सर्व प्रकरणांचा तपास पूर्ण केला जाईल, असे एसआयटीचे उपाध्यक्ष अरिजित पसायत यांनी पत्रकारांना सांगितले.
सक्तवसुली संचालनालय(ईडी) आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) माहिती गोळा करण्याचा आदेश दिला असून हे दोन्ही विभाग एसआयटीला लवकर नव्या यादीबाबत माहिती देतील, असेही पसायत म्हणाले.

Web Title: Another 1195 Indian names in Swiss Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.