आणखी २०० दहशतवादी देशात घुसखोरीच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 06:15 AM2020-11-23T06:15:17+5:302020-11-23T06:15:25+5:30
पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन
नवी दिल्ली : सध्या पाकिस्तानी हद्दीतून सुमारे २०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असून, त्यांना रोखण्यासाठी सुरक्षा दले सज्ज आहेत. या घुसखोरीला पाकिस्तानी लष्कर व आयएसआय या गुप्तहेर संघटनेची सक्रिय मदत असल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील नगरोटा येथे चकमकीत मारल्या गेलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी त्याआधी या संघटनेच्या पाकिस्तानातील शक्करगढ छावणीपासून रात्रीच्या अंधारात ३० किमी चालत सांबा सीमाक्षेत्रातून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. त्यानंतर ते जटवाल येथून श्रीनगरला जाणाऱ्या ट्रकमध्ये बसले असे तपासातून निष्पन्न झाले आहे. (वृत्तसंस्था)
कासिम हाच हल्ल्याचा मुख्य सूत्रधार
चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकरवी भारतात घातपाती कारवाया घडविण्याचे कारस्थान जैश-ए-मोहम्मदचा कमांडर कासिम जान याने आखले होते. २०१६ साली पठाणकोट येथील हवाई तळावर झालेल्या हल्ल्याचा कासिम हाच सूत्रधार होता. तो दहशतवादी नेता मुफ्ती रौफ असगर याच्या इशाऱ्यारून काम करतो.
असा लागला छडा
नगरोटा येथे १९ नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत ठार झालेल्या चार दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा व जीपीएस उपकरणे, वायरलेस सेट जप्त करण्यात आले होते. त्यातील माहितीची भारतीय गुप्तचर यंत्रणांनी छाननी केली. या दहशतवाद्यांनी पाकमधून कोणत्या मार्गाने भारतात घुसखोरी केली याचा छडा त्या माहितीवरून लागला आहे.
सांबातील बोगद्याचा घुसखोरीसाठी वापर?
जम्मू-काश्मीरमधील सांबा क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगत एक बोगदा आढळून आला आहे. जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी पाकमधून भारतात घुसखोरी करण्यासाठी याच बोगद्याचा वापर केला असावा असा सुरक्षा यंत्रणांचा कयास आहे. सीमेलगत असे आणखी काही बोगदे आहेत का या सुरक्षा जवान आता कसून शोध घेत आहेत.