१० दिवसांत आणखी एक हल्ला होणार होता; निवृत्त कमांडर ढिल्लन यांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 10:00 AM2023-02-27T10:00:12+5:302023-02-27T10:00:28+5:30
दोन दहशतवाद्यांच्या खात्म्यामुळे टळले संकट
श्रीनगर : १४ फेब्रुवारी २०१९च्या पुलवामा हल्ल्याच्या १० दिवसांत आणखी एक आत्मघाती दहशतवादी हल्ला होणार होता. याची कुणकुण भारतीय लष्कराला लागली होती. सुरक्षा दलांनी दोन पाकिस्तानींसह तीन दहशतवाद्यांना ठार करून दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडला, असा दावा माजी चिनार कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल (निवृत्त) केजेएस ढिल्लन यांनी त्यांच्या पुस्तकात
केला आहे.
‘कितने गाजी आये, कितने गाझी गए’ या पुस्तकात ढिल्लन लिहितात की, पुलवामा आत्मघाती हल्ल्यामागील हेतू स्पष्ट करण्यासाठी एका दहशतवाद्याने स्फोटके आणि इतर शस्त्रे दाखविणारा व्हिडीओ बनवला होता. या पुलवामा घटनेनंतर जैशचे दहशतवादी तुरिगाम गावात लपून हल्ल्याची योजना आखत होते. लष्कर आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी २४ फेब्रुवारी १०१९च्या रात्री संयुक्त कारवाईची योजना आखली.
संयुक्त पथकाने तीन दहशतवाद्यांना घेरले होते. दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार केला. जम्मू-काश्मीरचे पोलिस उपअधीक्षक अमन कुमार ठाकूर यांनी जवान बलदेव राम यांना वाचवण्यासाठी स्वत:च्या सुरक्षेची पर्वा न करता जखमी सैनिकाला सुरक्षित स्थळी नेले. त्यात ते स्वत: गोळी लागून जखमी झाले. त्यांनी दहशतवाद्याजवळ जाऊन त्याला ठार केले. तो पाकिस्तानचा रहिवासी जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी नोमान निघाला.
असे हे शौर्य...
ढिल्लन यांच्या पुस्तकात नायब सुभेदार सोमबीर यांच्या शौर्याचेही कौतुक करण्यात आले आहे. त्यांनी पाकिस्तानी दहशतवादी ओसामाला समोरासमाेरच्या गाळीबारात ठार
केले. डीएसपी ठाकूर आणि नायब सुभेदार सोमबीर या कारवाईत शहीद झाले. दोघांनाही शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.