ममतांना दिवसभरात दुसरा धक्का, तृणमूलला सोडचिठ्ठी देत आमदाराचा भाजपात प्रवेश
By बाळकृष्ण परब | Published: November 27, 2020 08:20 PM2020-11-27T20:20:10+5:302020-11-27T20:22:18+5:30
BJP News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासाठी आजचा दिवस हा दुहेरी धक्का देणारा ठरला.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासाठी आजचा दिवस हा दुहेरी धक्का देणारा ठरला. आज दुपारी नाराज असलेले मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असतानाच संध्याकाळी आमदार मिहिर गोस्वामी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत त्यांनी दिल्लीमध्ये भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले.
टीएमसीचे नेते असलेले मिहीर गोस्वामी यांनी काही दिवस आधीच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पश्चिम बंगालमधील कुचबिहार विधानसभा मतदारसंघातील टीएमसीचे खासदार असलेले मिहीर गोस्वामी हे शुक्रवारी भाजपा खासदार निशित प्रामाणिक यांच्यासोबत नवी दिल्लीसाठी रवाना झाले होते. तेव्हापासूनच ते भाजपामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
Delhi: Mihir Goswami joins Bharatiya Janata Party after resigning from Trinamool Congress, in the presence of BJP National General Secretary Kailash Vijayvargiya.#WestBengalpic.twitter.com/pnY06v0jR4
— ANI (@ANI) November 27, 2020
दरम्यान, पश्चिम बंगालच्या राजकारणातील मोठे नाव असलेले शुभेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. काही दिवसांपूर्वीपासून ते भाजपात दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आज त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, शुभेंदू अधिकारी यांनी गुरुवारी हुगळी रिव्हर ब्रिज कमिशनमधून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता आपल्या मंत्रिपदाचाही राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनामापत्रात शुभेंदू अधिकारी म्हणाले की, मी माझ्याकडील मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. मी राज्यपालांनाही याबाबतची माहिती दिली आहे. तुम्ही मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे.