भाजपाला आणखी एक धक्का! कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आमदारकीचा राजीनामा, पक्षही सोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 12:38 PM2023-04-16T12:38:23+5:302023-04-16T12:40:14+5:30
जगदीश शेट्टर यांनी रविवारपर्यंत उमेदवारी जाहीर करण्याचा अल्टिमेटम दिला होता. परंतू भाजपाने काही त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही.
भाजपाला वरिष्ठांना डावलून युवा नेत्यांना संधी देण्याचे प्रयोग कर्नाटकात भारी पडण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात माजी उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन काँग्रेसची वाट धरलेली असताना आता माजी मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला आहे. याचा परिणाम आसपासच्या २०-२५ जागांवर होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
जगदीश शेट्टर यांनी रविवारपर्यंत उमेदवारी जाहीर करण्याचा अल्टिमेटम दिला होता. परंतू भाजपाने काही त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. यामुळे अखेर त्यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याचबरोबर आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. शेट्टर आता कोणत्या पक्षात जाणार की अपक्ष लढणार हे काही दिवसांतच समोर येईल. जगदीश शेट्टर धारवाड-हुबळी मध्य मतदारसंघातून अनेकदा आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत. उत्तर कर्नाटकातील सवदी आणि शेट्टर असे दोन नेते सोडून गेल्याने या भागात भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे.
या वेळी भाजपाने तिकीट न दिल्याने शेट्टर नाराज झाले होते. राजीनाम्यावर आता भाजपाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. शेट्टर यांनी पक्षापेक्षा स्वत:लाच जास्त महत्व दिले आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते शेट्टर यांच्याशी चर्चा करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते, परंतू त्यांनी ऐकले नाही, असे भाजपाने म्हटले आहे.
शेट्टर यांचा आसपासच्या मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. यामुळे भाजपाने अद्याप या मतदारसंघासह कर्नाटकातील १२ मतदारसंघांच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाहीय. शेट्टर यांनी आपल्या बंडाच्या भुमिकेला येडीयुराप्पांचाही हवाला दिला आहे. शेट्टर यांना ११ एप्रिलला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचाही फोन आला होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने युवा नेत्यांना संधी देण्यासाठी जागा द्यावी, म्हणून तुम्ही उमेदवारी मागे घ्या, असे ते म्हणाले होते.
कर्नाटकात राष्ट्रवादी लढविणार ४० जागा
बंगळूर/मुंबई : कर्नाटकात किमान ४० जागा राष्ट्रवादी लढविणार आहे. शरद पवार यांच्या विचारसरणीला अनुसरून भाजपमधील अनेक असंतुष्ट नेते राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत असे राष्ट्रवादीचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष हरी आर यांनी शनिवारी सांगितले. शरद पवार यांनी पक्षनेते आणि कर्नाटकातील कार्यकर्त्यांशी शनिवारी बैठक घेतली. भाजपच्या चार ते पाच विद्यमान आमदारांसह बंगळुरूचे माजी महापौरही पक्षात येण्यास इच्छुक आहेत, असेही रवी यांनी सांगितले.