आणखी एका शूर पायलटची गोष्ट; 1965 मध्येही पाकचे वेगवान विमान पाडलेले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 02:20 PM2019-03-06T14:20:08+5:302019-03-06T14:24:07+5:30
1965 च्या युद्धावेळी स्क्वॉड्रन लीडर ए बी देवय्या यांनी अमेरिकन बनावटीचे पाकिस्तानी लढाऊ विमान एफ-104 स्टारफायटर पाडले होते.
नवी दिल्ली : भारतीय हवाईदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या साहसाची सध्या चर्चा होत आहे. भारतीय हवाई दलाच्या जुन्या पण अद्ययावत केलेल्या मिग 21 या विमानांनी पाकिस्तानला दिलेले तुलनेने अत्यंत अद्ययावत एफ16 हे विमान पाडले होते. असेच साहस 1965 च्या युद्धावेळीहीभारतीय हवाई दलाच्या शूर पायलटने केले होते. या दुर्दैवी पायलटना मात्र मातृभूमी नशिबात नव्हती. अखेर त्यांना मरणोत्तर महावीरचक्र प्रदान करण्यात आले होते.
पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अमेरिकेने 10 वर्षांपूर्वी त्यांची एफ 16 ही लढाऊ विमाने दिली होती. मात्र, पाकिस्तानने ही विमाने 27 फेब्रुवारीला भारतावर हल्ला करण्यासाठी वापरली. हा आरोप पाकिस्तान जरी फेटाळत असला तरीही पुरावे समोर आलेले आहे. या झटापटीत भारताने पाकिस्तानचे एक एफ 16 हे लढाऊ विमानही पाडले आहे. भारताकडे तुलनेने कमी क्षमतेची विमाने आहेत. असेच साहस 1965 सालच्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धावेळी भारताने दाखविले होते.
1965 च्या युद्धावेळी स्क्वॉड्रन लीडर ए बी देवय्या यांनी अमेरिकन बनावटीचे पाकिस्तानी लढाऊ विमान एफ-104 स्टारफायटर पाडले होते. हे धाडस त्यांनी भारतीय हवाई दलाच्या साध्या फायटर विमानाच्या माध्यमातून केले होते. मिस्टीर असे या लढाऊ विमानाचे नाव होते जे फ्रान्सने बनविले होते. देवय्या यांना मरणोत्तर महावीरचक्र प्रदान करण्यात आले होते.
भारताचे हवाई दलप्रमुख बीएस धनोआ यांनी सांगितले की, 1965 मध्ये अत्यंत जड, कमी वेगाच्या भारतीय हवाईदलाच्या मिस्टीर विमानाने पाकिस्तानचे स्टारफायटर विमान पाडले होते. यासारखाच प्रकार काही दिवसांपूर्वी घडला आहे.
मिस्टीर आणि स्टारफायटर यांच्यातील लढाईचा किस्सा ब्रिटीश लेखक जॉन फ्रीकर यांनी 1979 मध्ये त्यांचे पुस्तक बॅटल फॉर पाकिस्तानमध्ये सांगितला आहे. 7 सप्टेंबर 1965 मध्ये देवय्या यांनी अतुलनीय साहस दाखविले होते. गंभीररित्या जखमी झाल्यानंतरही त्यांनी स्टारफायटर विमानाला पाडले होते. हे या युद्धामध्ये नष्ट झालेले एकमेव स्टारफायटर विमान होते, असा उल्लेख त्यांनी केला आहे.
पाकिस्तानी पायलटची एक चूक, अन् संधी साधलीच
स्क्वॉड्रन लीडर देवय्या तेव्हा पाकिस्तानच्या सरगोधा येथील हवाई तळावर हल्ला करण्याच्या मिशनवर होते. त्यांना पाकिस्तानी हवाई दलाची सामुग्री नष्ट करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. पाकिस्तानचे स्टारफायटर विमान लेफ्टनंट अमजद हुसेन उडवत होते. त्यांचे विमान वेगवान आणि अत्याधुनिक होते. मात्र, हुसेन यांनी देवय्या यांना चकमा देण्यासाठी विमान वळविण्याचा निर्णय घेतला आणि वेग कमी केला. ही त्यांची मोठी चूक ठरली. मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवत देवय्या यांनी स्टारफाईटवर मिसाईल डागले, असे हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
देवय्या यांचा मृत्यू रहस्यच बनला
हुसेन यांच्याविमानवर देवय्या यांनी एकाचवेळी अनेक हल्ले केले. हुसेनना यामुळे विमानातून इजेक्ट होणे भाग पडले. मात्र, देवय्या यांच्यासमोर वेगळेच संकट उभे ठाकले होते. मिस्टीर या विमानाची रेंज कमी होती. त्यांच्याकडे परत भारतीय हद्दीत येण्यासाठी पुरेसे इंधनही नव्हते. पुढे देवय्या यांचे काय झाले कोणालाच समजले नाही. त्यांना मृत्यूने गाठल्याचा अंदाज आला होता. यामुळे ते त्यांचे विमान पडेपर्यंत लढत राहिले. पाकिस्तानी हवाई दलानुसार देवय्या विमानातून बाहेर पडू शकले नाहीत, असे निवृत्त विंग कमांडर प्रफुल्ल बक्शी यांनी सांगितले.