पचौरींविरुद्ध आणखी एक तक्रार
By admin | Published: February 12, 2016 03:53 AM2016-02-12T03:53:27+5:302016-02-12T03:53:27+5:30
विद्यार्थ्यांनी निषेधाचा पवित्रा घेतल्यानंतर दि एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूटचे (टेरी) प्रमुख डॉ. आर. के. पचौरी रजेवर गेले आहेत. ‘टेरी’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पचौरी यांच्या हातून पदवी
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांनी निषेधाचा पवित्रा घेतल्यानंतर दि एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूटचे (टेरी) प्रमुख डॉ. आर. के. पचौरी रजेवर गेले आहेत. ‘टेरी’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पचौरी यांच्या हातून पदवी/ प्रमाणपत्रे घेण्यास नकार दिल्यानंतर पचौरी यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. ते ७ मार्च रोजी होणाऱ्या या पदवीदान समारंभाला हजर राहणार नसल्याचे समजते. दरम्यान संस्थेतील आणखी एका महिलेने पचौरी यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे.
संस्थेचे कुलपती पचौरी यांनी गुरुवारी सकाळी रजेवर जाण्याचा आपला निर्णय कळविला. त्यांच्या जागी दीक्षांत समारंभाला लीना श्रीवास्तव या उपस्थित राहतील, अशी माहिती हंगामी कुलगुरू राजीव सेठ यांनी दिली. श्रीवास्तव ह्या संस्थेच्या कुलगुरू आहेत. पण त्या सुटीवर असल्याने त्यांचा कार्यभार सेठ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
पचौरी यांना कार्यकारी उपाध्यक्षपदी बढती देण्याच्या टेरीच्या गव्हर्निंग कौंसिलच्या निर्णयाचा विरोध करीत संस्थेच्या १९ विद्यार्थ्यांनी बुधवारी पचौरी यांच्या हातून पदवी/प्रमाणपत्रे घेण्यास नकार दिला होता. पचौरी यांची टेरीच्या कार्यकारी उपाध्यक्षपदी नियुक्त करण्याचा टेरीचे माजी कर्मचारी, माजी विद्यार्थ्यांनीही निषेध केला आहे. अजय माथुर यांनी महासंचालकपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर पचौरी यांनी गेल्या ८ फेब्रुवारीला कार्यकारी उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)