सोशल मीडियावर आणखी एक जुमला! केरळला 25 कोटींची 'त्यांची' मदत खोटीच...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 07:41 PM2018-08-27T19:41:04+5:302018-08-27T20:10:31+5:30
नवी दिल्ली : केरळमध्ये महापुराने हाहाकार माजवला असताना सोशल मीडियावर काहींनी अफवांचा महापूर आणला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या खासदारांनी तब्बल 25 कोटी रुपयांचा धनादेश केरळमधील पूरग्रस्तांसाठी दिल्याचे वृत्त आणि फोटो सोशल मीडियावर पसरवण्यात आले होते. हे फोटो दुसऱ्याच एका सरकारी कंपनीने दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारत सरकारची कंपनी भारत पेट्रोलिअमने हा 25 कोटींचा धनादेश केंद्रीय मंत्री अल्फान्स आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे सुपुर्द केला होता. मात्र, काहींनी हा फोटो भाजपच्या खासदारांनी मदत निधी दिल्याचे सांगत सोशल मिडीयावर व्हायरल केला होता.
या फोटोला झूम करून पाहिल्यास धनादेश देणाऱ्याच्या नावामुळे सर्व चित्र स्पष्ट होते. तेथे भारत पेट्रोलिअम लिमिटेड असे नाव ठळकपणे नमुद केलेले आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत अन्न, पाणी आणि गॅस सिलिंडर पोहोचवत आहे. कोची रिफायनरी, डेपोचे अधिकारी मदत करत आहेत, असे भारत पेट्रोलिअमने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर सांगितले आहे.
खरेतर हा धनादेश केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व पेट्रोलियम कंपन्यांकडून जमवलेल्या निधीतून देण्यात आला आहे. यावेळी भाजपच्या खासदारासह भारत पेट्रोलिअमचा अधिकारीही उपस्थित होता.