मंदसौरमध्ये आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू
By admin | Published: June 10, 2017 12:26 AM2017-06-10T00:26:03+5:302017-06-10T00:26:03+5:30
पोलीस गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री एका तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने खळबळ उडाली.
मंदसौर : पोलीस गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री एका तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने खळबळ उडाली. पोलिसांच्या मारहाणीतच या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे त्या भागात तणाव कायम असून, तेथील इंटरनेट सेवा अद्याप बंद आहे. तेथील संचारबंदी सकाळी १0 ते संध्याकाळी ६ या वेळेत शिथिल करण्यात आली होती. मात्र रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तुकड्या तिथे तैनात आहेत.
घन:श्याम धाकड (२६) हे रात्रीच्या वेळी मंदिरात जात असताना पोलिसांनी या शेतकऱ्याला अडवून त्याला लाठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर या शेतकऱ्याला इंदोरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत.
पोलिसांनी सांगितले की, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चौकशी सुरु आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली. या शेतकऱ्याचेतीन सहकारी दिनेश मालवी, शिवनारायण मालवी आणि गणेश मालवी हे बेपत्ता असल्याचा दावा काँग्रेसचे नेते माजी खासदार सज्जन सिंह वर्मा यांनी केला आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करावा आणि शवविच्छेदनाचा व्हिडिओ तयार करावा, अशी मागणीही वर्मा यांनी केली आहे. या आंदोलनादरम्यान आतापर्यंत १५६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
जिल्हाधिकारी श्रीवास्तव यांनी सांगितले की, अनेक एटीएम सुरु झाले असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. इंटरनेट सेवा पूर्ववत होण्यास काही वेळ लागू शकतो. या आंदोलनात जळालेली दुकाने आणि वाहने यांचा अहवाल तयार करण्यात येत असून संबंधितांना ही मदत चेकने देण्यात येईल.
शेतकरी आंदोलन आता छिंदवाडा जिल्ह्यातही पोहचले आहे. मंदसौरच्या पिपलीमंडीत रॅपिड अॅक्शन फोर्सच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तथापि, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून शेतकऱ्यांना चर्चेसाठी नवा
प्रस्ताव देण्यात आला आहे. मतभेद
दूर करण्यासाठी सरकार
चर्चेसाठी तयार असल्याचे यात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)