अवकाशात भारताचा आणखी एक डोळा!
By Admin | Published: June 24, 2017 02:59 AM2017-06-24T02:59:00+5:302017-06-24T02:59:00+5:30
दहशतवादी तळांवर नजर ठेवण्यसाठी आणि पाकिस्तानी बंकर हेरण्यासाठी भारताने अवकाशात आणखी उपग्रह पाठवला आहे.
नवी दिल्ली : दहशतवादी तळांवर नजर ठेवण्यसाठी आणि पाकिस्तानी बंकर हेरण्यासाठी भारताने अवकाशात आणखी उपग्रह पाठवला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने पुन्हा एकादा एकाच वेळी अनेक उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे यावेळी भारताने जपान, अमेरिका आणि इंग्लंडसारख्या प्रगत देशांतीलही उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी सेवा दिली आहे.
इस्रोने शुक्रवारी सकाळी पीएसएलव्ही-सी३८ या अग्निबाणाद्वारे ३१ उपग्रहांचे प्रक्षेपण केले. सकाळी ९.२९ वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन उड्डाण केल्यानंतर २७ मिनिटांनी पीएसएलव्हीने कार्टोसॅट - २ मालिकेतील उपग्रहासह अन्य २९ छोट्या उपग्रहांना आपल्या कक्षेत सोडले. इस्रोच्या पीएसएलव्हीचे हे ४० वे उड्डाण होते. ३१ उपग्रहांमध्ये भारताचे दोन आणि २९ परदेशी उपग्रह आहेत. या उपग्रहांमध्ये कार्टोसॅट - २ मालिकेतील सहावा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला असून कार्टोसॅटमुळे भारताची टेहळणी क्षमता वाढणार आहे. कार्टोसॅटचे वजन ७१२ किलो असून, अन्य ३० उपग्रहांचे मिळून २४३ किलो वजन आहे.
कन्याकुमारी जिल्ह्यातील नुरुल इस्लाम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनवलेला उपग्रह अवकाशात पाठवला गेला आहे. शेती पीक व आपत्ती व्यवस्थापनामध्ये या उपग्रहाची मदत होईल. इस्त्रोने फेब्रुवारीत एकाच वेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करुन इतिहास रचला होता.
१४ देशांना दिली सेवा
आॅस्ट्रिया, बेल्जियम, चिली,
चेझ रिपब्लिक, फिनलँड,
फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, लॅटव्हिया, लिथूआनिआ, स्लोवाकिया, इंग्लंड, अमेरिका.
या नव्या डोळ्यातून काय दिसणार?
अर्धा स्क्वेअर मीटर एवढ्या छोट्या आकाराची कोणतीही वस्तू हा उपग्रह टिपणार आहे.भारतीय सीमेपलीकडे पाकमध्ये होणाऱ्या हालचाली टिपता येणार.छोटे-छोट
बंकरही लष्कराला दिसू शकणार, त्याची माहिती मिळणार.दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी लष्कराला मदत होणार.
यापूर्वी पाठवण्यात आलेल्या कार्टोसॅट मालिकेतील उपग्रहांनी लष्करासाठी मोठी मदत केली आहे. कार्टोसॅटद्वारे पाठवण्यात आलेल्या छायाचित्रांच्या मदतीनेच लष्कराने पाक सीमेवरील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले होते.