ओडिशात आणखी एक रेल्वे अपघात होता-होता वाचला, रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाने मोठा धोका टळला!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 03:41 PM2023-06-10T15:41:24+5:302023-06-10T15:42:20+5:30
यासंदर्भात स्टेशन व्यवस्थापकांनी आरपीएफकडे तक्रार दाखल केली आहे. आरपीएफचे निरीक्षक दिलीप कुमार यांच्यासोबत संपर्क साधला असता, याप्रकरणी तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भुवनेश्वर - ओडिशातील बालेश्वर रेल्वेअपघातासारखा आणखी एक मोठा रेल्वेअपघात होता होता वाचला. येथील भद्रक जिल्ह्यातील मंजुरी रोड स्टेशनवर इंटरलॉकमध्ये एक मोठा दगड अडकला होता. मात्र, सुदैवाने हा दगड रेल्वेच्याच एका कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आला. त्याने तो तातडीने काढला, यामुळे पुढील भीषण दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, भद्रक जिल्ह्यातील भंडारीपोखरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंजुरी रोड स्टेशनवर इंटरलॉकमध्ये एक मोठा दगड अडकलेला होता. येथून रेल्वे गेली असती तर ओडिशामध्ये आणखी एक मोठा रेल्वे अपघात घडला असता. कारण हा दगड रेल्वेला ट्रॅकवरून उतरवण्यास पुरेसा होता.
यासंदर्भात स्टेशन व्यवस्थापकांनी आरपीएफकडे तक्रार दाखल केली आहे. आरपीएफचे निरीक्षक दिलीप कुमार यांच्यासोबत संपर्क साधला असता, याप्रकरणी तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या बोगीत लागली आग -
येथील रूप्सा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी आणखी एक रेल्वे दुर्घटना होता होता वाचली. येथे एका रेल्वे कर्मचाऱ्याला मालगाडीच्या बोगीतून धूर निघताना दिसला. यानंतर त्याने लगेचच बालेश्वर अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग विझवली. मात्र, कोळसा भरलेल्या मालगाडीला आग कशी लागली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.