हनीप्रीतचं आणखी एक नवं नाव, बनावट नावाने चालवत होती फेसबुक अकाऊंट?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 11:56 AM2017-10-07T11:56:45+5:302017-10-07T11:58:58+5:30
बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत हिचं आणखी एक नवं नाव समोर आलं आहे.
चंदीगड- बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत हिचं आणखी एक नवं नाव समोर आलं आहे. हनीप्रीत बनावट नावाने मोबाइल सिमकार्ड आणि फेसबुक अकाऊंट चालवत असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. हनीप्रीतला लोक प्रियंका तनेजा या नावाने ओळखत होती तसंच काही लोकांसाठी हनीप्रीतचं नाव गुरलीन इन्सा होतं. गुरलीन इन्सा असं हनीप्रीतचं तिसरं नाव आहे. हनीप्रीतच्या या तिसऱ्या नावाची आता सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.
हरियाणा पोलिसांच्या एसआयटी पथकाकडून हनीप्रीतच्या या नव्या नावामागील खऱ्या कारणाचा तपास केला जातो आहे. हनीप्रीतने या खोट्या नावाने मोबाइल सिमकार्ड घेतलं होतं. नाव बदलून सिमकार्ड घेण्याच्या मागे काय कारण होतं? याचाही तपास सुरू आहे.
इंडियना फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनमधील (आयएफटीडीए) हनीप्रीतचं सदस्यत्व संपलं आहे. संस्थेच्या प्रमाणपत्रावर हनीप्रीतने तिचा जो मोबाइल नंबर लिहाला होता तो नंबर गुरलीन इन्सा या नावाने रजिस्टर आहे. याच नंबरवरून हनीप्रीत फेसबुक अकाऊंटसुद्धा चालवत होती. या अकाऊंटला काही दिवसांपूर्वी डिलीट करण्यात आलं. हनीप्रीतच्या या नंबरची पडताळणी केल्यावर तो नंबर पानीपतचा असल्याचं समोर आलं.
हनीप्रीत नाव बदलून फेसबुक अकाऊंट वापरत असावी, असा अंदाज सायबर तज्ज्ञांनी वर्तविला आहे. किंवा हनीप्रीतचा हा नंबर ज्या पत्त्यावर होता त्याने तो जीआय या नावाने सेव्ह केला असावा, असाही अंदाज वर्तविला जातो आहे.
पोलिसांच्या हाती लागली हार्ड डिस्क
दुसरीकडे, हनीप्रीत आणि राम रहीमची रहस्य उघड करणाऱ्या डेरा सच्चा सौदामधून पोलिसांना हार्ड डिस्क सापडली आहे. या हार्ड डिस्कमधून अनेक रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या मते हनीप्रीतने 1.25 कोटी पंचकुलाच्या डेरा सच्चा सौदाच्या ब्रँचमध्ये दिले होते. पंचकुलामधील हिंसाचार आधीपासून निश्चित असल्याचं पोलिसांचं मत आहे. या सगळ्याच्या मागील मास्टरमाईंड हनीप्रीत होती. राम रहीमला दोषी ठरविल्यावर तेथे हिंसाचार घडविण्यासाठी हे पैसे दिले होते. राम रहीमचा चालक राकेश कुमार याने पोलीस तपासात याची कबूली दिली आहे.