आणखी एक पक्ष एनडीएमध्ये प्रवेश करणार; लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी BJP आणि BJD मध्ये युतीची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 10:21 AM2024-03-07T10:21:26+5:302024-03-07T10:22:54+5:30
देशात लोकसभेच्या निवडणुका काही दिवसातच होणार आहेत. त्या आधी मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत.
देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. आता आणखी एका पक्षाने एनडीएमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकत दिले आहेत. त्यामुळे एनडीएची ताकद आणखी वाढणार आहे. ओडिशातील बीजेडी आणि भाजपने युतीचे संकेत दिले आहेत. दोन्ही पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढू शकतात. बुधवारी बीजेडी नेत्यांनी भुवनेश्वरमध्ये मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासोबत दीर्घ बैठक घेतली. दिल्लीत, ओडिशा भाजप नेत्यांनी पक्षाच्या हायकमांडशी विचारमंथन केले आहे.
बीजेडी'चे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भाजपशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. येथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे भाजप आणि बीजेडी यांच्यात युती होण्याची शक्यता बळावली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, विविध पैलूंवर आधारित अंतिम निर्णय सर्वोच्च नेतृत्वाला घ्यायचा आहे.
रामदास कदमांची भाजपावर आगपाखड; "तुमच्यावर विश्वास ठेऊन आम्ही आलोय, पण तुम्ही..."
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, ओडिशा भाजपचे अध्यक्ष मनमोहन सामल आणि माजी केंद्रीय मंत्री जुआल ओरम यांनी येथील कोअर कमिटीच्या बैठकीत हजेरी लावली. गृहमंत्री शाह आणि नड्डा यांनी ही बैठक घेतली. या भेटीनंतर ओराम म्हणाले, होय, युतीसह इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. पक्षाचे केंद्रीय नेतृत्व अंतिम निर्णय घेईल. युती झाल्यास भाजप ओडिशातील लोकसभेच्या बहुतांश जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले. तर प्रादेशिक पक्ष म्हणजेच बीजेडी जास्तीत जास्त विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार आहे.
ओडिशामध्ये लोकसभेच्या २१ आणि विधानसभेच्या १४७ जागा आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बीजेडीने १२ जागा जिंकल्या आणि भाजपने ८ जागा जिंकल्या. तर विधानसभा निवडणुकीत बीजेडीला ११२ तर भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. ओडिशामध्ये पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांना युती करायची आहे, याधी २००९ मध्ये दोन्ही पक्षांची युती तुटली होती.