एनडीएमधून अजून एक पक्ष बाहेर पडणार? उपेंद्र कुशवाहा मंत्रिपदाचा राजीनामा देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 12:19 PM2018-12-10T12:19:18+5:302018-12-10T12:20:26+5:30
बिहारमधील एनडीएच्या आघाडीत आपल्या पक्षाला पुरेसे स्थान मिळत नसल्याने नाराज अससेले उपेंद्र कुशवाहा आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - बिहारमधील एनडीएच्या आघाडीत आपल्या पक्षाला पुरेसे स्थान मिळत नसल्याने नाराज अससेले उपेंद्र कुशवाहा आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या आरएलएसपी या पक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी कुशवाहा यांनी केली होती. मात्र भाजपाकडून त्या मागणीकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे कुशवाहा गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. दरम्यान, उपेंद्र कुशवाहा हे एनडीएला सोडचिठ्ठी देऊन विरोधी पक्षांच्या आज होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बिहारमधील एनडीएच्या आघाडीत संयुक्त जनता दल पुन्हा एकदा सहभागी झाल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. दरम्यान, भाजपा, जेडीयू, लोकजनशक्ती पार्टीमध्ये होणाऱ्या जागावाटपात आपल्याला पुरेसे स्थान मिळत नसल्याने कुशवाहा चिंतीत होते. त्यांनी आपली नाराजीही वारंवार व्यक्त केली. मात्र त्यांना फारसे महत्त्व देण्यात आले नाही. दरम्यान, आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचे कुशवाहा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच दुपारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून आपली पुढील भूमिका स्पष्ट करू, असे कुशवाहा यांनी सांगितले.
Upendra Kushwaha to ANI: I will not participate in the meeting of NDA allies today. (file pic) pic.twitter.com/mM8wdaW1Ff
— ANI (@ANI) December 10, 2018
दरम्यान, उपेंद्र कुशवाहा हे आपला राष्ट्रीय लोक समता पार्टी (आरएलएसपी) हा पक्ष शरद यादव यांच्या लोकतांत्रिक जनता दल या या पक्षाल विलीन करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे कुशवाहा यांच्या पक्षातील अनेक नेते जेडीयूच्या संपर्कात असल्याचेही वृत्त आहे.